रांजणगाव गणपती -रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित कंपनीमध्ये करोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला असल्याची अफवा पसरवल्या प्रकरणी रांजणगाव पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली. गोकुळ राजू शिंदे (वय27, सध्या रा. शिक्रापूर, मूळ रा. जवळा खुर्द ता. नेवासा जि. अहमदनगर), शिरीष म्हस्कू डोमाळे (वय 26 रा. वाबळेवाडी, शिक्रापूर ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
तर रांजणगावचे कामगार तलाठी सतीश कैलास पलांडे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित कंपनीमध्ये करोना रोगाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला असल्याची चर्चा शनिवार्री (दि. 9) सोशल मीडियावर केली. ही बाब तलाठ्यांनी रांजणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या निदर्शनास आणून दिले असता पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले व त्यांच्यावर करोनाची अफवा पसरवल्या प्रकरणी सोमवारी (दि. 11) गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी सांगितले.