Rubina Dilaik: टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलैक हिने नुकतेच मनोरंजन विश्वातील एका महत्त्वाच्या विषयावर स्पष्टपणे मत मांडले आहे. आई झाल्यानंतर अनेक अभिनेत्रींच्या करिअरमध्ये अडथळे का येतात, याबद्दल बोलताना तिने इंडस्ट्रीतील जुन्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तिच्या मते, आजही अनेक निर्माते आणि समाजातील काही लोक नव्या आईकडे “कमजोर” म्हणून पाहतात आणि त्यामुळे महिलांना मोठ्या संधींपासून दूर ठेवले जाते. रुबीना म्हणाली की, एखादी अभिनेत्री आई झाल्यानंतर तिच्यात आधीसारखी ऊर्जा, मेहनत करण्याची क्षमता किंवा कामाबद्दलची आवड उरत नाही, असा चुकीचा समज अनेकांच्या मनात असतो. त्यामुळे अनेक अभिनेत्रींच्या हातून चांगले प्रोजेक्ट्स निसटतात. काही निर्मात्यांना वाटते की, बाळाची जबाबदारी सांभाळताना अभिनेत्री शूटिंगला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही. या विचारांमुळे महिलांना काम देताना संकोच केला जातो. तिने सांगितले की, अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की जवळपास ६२ टक्के महिला गर्भधारणेनंतर पुन्हा आपल्या करिअरमध्ये पूर्वीसारख्या परतू शकत नाहीत. यामागे केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्या नसून समाजाची मानसिकताही मोठ्या प्रमाणात कारणीभूत असते. महिलांना प्रत्येक टप्प्यावर जज केले जाते. करिअर, लग्न किंवा मातृत्व प्रत्येक निर्णयावर त्यांना प्रश्नांचा सामना करावा लागतो. Rubina Dilaik & Abhinav Shukla रुबीना दिलैक हिच्या मते, सतत होणाऱ्या टीका आणि दबावामुळे अनेक महिलांचा आत्मविश्वास कमी होतो. प्रत्येक महिला मानसिकदृष्ट्या इतकी मजबूत असेलच असे नाही की ती या दबावाला सहज सामोरी जाईल. अनेक वेळा महिलांना स्वतःची स्वप्ने आणि करिअर बाजूला ठेवावे लागते. मात्र रुबीना स्वतः आई झाल्यानंतरही करिअरमध्ये सक्रिय आहे. तिने स्पष्टपणे सांगितले की, “आई झाल्यावर आयुष्य किंवा करिअर संपत नाही.” ती स्वतःच्या कामातून इतर महिलांसाठी प्रेरणा निर्माण करू इच्छिते. स्वतःला काम सुरू ठेवण्याची संधी मिळाल्याबद्दल ती स्वतःला भाग्यवान समजते. तिच्या मते, महिलांनी आई झाल्यानंतरही नवीन संधी मिळवण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे यायला हवे. सध्या मनोरंजन विश्वात महिलांच्या करिअर आणि मातृत्व या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळण्याच्या चर्चांना वेग आला आहे. अनेक अभिनेत्री आता या विषयावर उघडपणे बोलताना दिसत आहेत. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत असल्याचे चित्रही दिसत आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर खतरों के खिलाड़ी या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या १५व्या पर्वात रुबीना दिलैक झळकणार आहे. त्यामुळे तिचे चाहते पुन्हा एकदा तिला नव्या अंदाजात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.