स्ट्रॉबेरीवर रुसवा अजूनही कायम

ख्रिसमस, नवर्षारंभासाठी अपेक्षित मागणी नसल्याचे चित्र
पुणे – आंबट, गोड चवीची, लाल, गुलाबी रंगाची स्ट्रॉबेरी म्हटल्यावर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. या स्ट्रॉबेरीची ख्रिसमस, नवीन वर्षारंभाच्या काळात दरवर्षी चलती असते. मात्र, यावर्षी अपेक्षित मागणी नाही. भावही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. घाऊक बाजारात दोन किलो स्ट्रॉबेरीला दर्जानुसार 180 ते 250 रुपये भाव मिळत आहे. गेल्या वर्षी यावेळी 250 ते 350 रुपये भाव मिळत होता, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची यांनी दिली.
लांबलेल्या पावसामुळे यावर्षी स्ट्रॉबेरीची लागवड उशिरा झाली. त्यामुळे उत्पादनही कमी झाले असून, दरवर्षीच्या तुलनेत सुमारे 50 माल बाजारात येत आहे. याविषयी काची म्हणाले, “सध्या बाजारात दररोज 2 ते 3 टन आवक होत आहे. मागील वर्षी ही 5 ते 6 टन होत होती. ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत स्ट्रॉबेरीचा हंगाम असतो. मात्र, ख्रिसमस, नववर्षारंभाच्या काळात स्ट्रॉबेरीला गोव्यातून जास्त मागणी असते. मात्र, नेहमीच्या तुलनेत यंदा मागणी कमी आहे. मुंबई, बंगळुरू, पुणे शहर, उपनगर येथूनही मागणी आहे. सुरूवातीला प्रत घसरलेल्या मालाची बाजारात आवक होत होती. मात्र, आता चांगल्या मालाची आवक होत आहे. परिणामी, काहीशी मागणी वाढली आहे. भाव कमी मिळत असल्याने शेतकरी नाराज आहेत.’




