पुणे- पक्क्या वाहन परवान्याच्या टेस्टसाठी तारीख मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या शिकाऊ परवानाधारकांना “आरटीओ’ ने दिलासा दिला आहे. या उमेदवारांसाठी सुट्टीच्या दिवशी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात हजारो नागरिक पक्क्या वाहन परवान्याच्या प्रतीक्षेत असून, त्यांना टेस्टसाठी पुढील तारीख उपलब्ध होत नाही. अशा उमेदवारांसाठी आता आरटीओ प्रशासनाने सुट्टीच्या दिवशी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लर्निंग लायसन्सची (शिकाऊ परवाना) मुदत संपत आलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
वाहन परवाना काढण्यासाठी सुरुवातीला शिकाऊ आणि यानंतर पक्क्या परवान्यासाठी परीक्षा देण्याची गरज असते. परिवहन विभागाने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन सेवेनुसार आधार क्रमांकाला मोबाइल नंबर लिंक असलेल्या व्यक्तींना आता घरबसल्या शिकाऊ वाहन परवाना काढता येऊ शकतो. याशिवाय “आरटीओ’मध्येदेखील हे कामकाज सुरू आहे.
त्यामुळेच शिकाऊ वाहन परवाना काढणाऱ्या नागरिकांची संख्या वेगाने वाढली आहे. ही संख्या वाढल्याने या शिकाऊ परवानाधारकांना आता पक्का परवाना मुदत संपण्याच्या आत काढावा लागणार आहे. परंतु पक्क्या परवान्यासाठी जी परीक्षा असते, त्याची अपॉइंटमेंटच मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.