satara | आरटीओ विनोद चव्हाण यांची पदोन्नतीने बदली

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद वैजनाथ चव्हाण यांची पदोन्नतीने प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांना 6 जूनच्या शासकीय कार्यादेशाने तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी विनोद चव्हाण यांची सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयात बदली झाली होती. त्यावेळी येथील परवाना व्यवस्थांचे संगणकीकरण, नूतन परवाना ऑनलाइन परीक्षा, तसेच विविध सोयीसुविधांकरिता विनोद चव्हाण यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला.
राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सुद्धा कारवाई करून त्यांनी दीड कोटींपेक्षा अधिक महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला. साताऱ्याच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला परिवहन विभागाचा दर्जा देण्याकरता त्यांचे प्रयत्न विशेष ठरले. विनोद चव्हाण यांची लातूर येथे बदली झाली असून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप मेत्रे यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपवण्यात आला आहे.





