‘बेटी बचाओ’चे 455 कोटी रूपये गायब झालेले नाहीत; खर्गेंच्या दाव्यावर मंत्रालयाचा खुलासा

नवी दिल्ली – महिला आणि बालविकास मंत्रालयाने बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे. जनतेचाकोणताही पैसा गायब झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मिळालेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की सरकारच्या महत्त्वाकांक्षी बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेतून ४५५ कोटी रुपये गहाळ झाले आहेत असा दावा कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला होता.
त्यांच्या दाव्यानंतर, मंत्रालयाने हे स्पष्टीकरण जारी केले. मंत्रालयाने सांगितले की, या वर्षी ३१ जानेवारीपर्यंत बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेअंतर्गत एकूण ९५२.०४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
यामध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वाटप केलेले ५२६.५५ कोटी रुपये आणि राष्ट्रीय स्तरावर विविध उपक्रमांवर खर्च केलेले ४२५.४९ कोटी रुपये समाविष्ट आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे. खोटे कथन तयार करण्यासाठी तथ्ये चुकीच्या पद्धतीने सादर केली गेली आहेत. जनतेचा कोणताही पैसा वाया गेलेला नाही.
बेटी बचाओ, बेटी पढाओ सारख्या योजनांद्वारे प्रत्येक मुलीला वाचवण्याच्या आणि शिक्षित करण्याच्या आपल्या ध्येयावर सरकार ठाम आहे, जी एक लोकचळवळ बनली आहे आणि महत्त्वपूर्ण सामाजिक आणि वृत्ती बदल घडवून आणत आहे अशी टिप्पणीही मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.
खर्गे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आणि म्हटले होते की, माहिती अधिकार कायद्यानुसार मोदी सरकारच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेत ४५५ कोटी रुपये गायब झाल्याचे उघड झाले आहे. गेल्या दहा वर्षांत महिलांना भाजप शासित राज्यांत आणि कधी कधी भाजपच्या गुंडांकडून छळ सहन करावा लागतो आहे. त्या पक्षाचे महिलांवर आता पुरे झाले हल्ले ही जाहीरात थट्टा करणारीच आहे.




