पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यातील पालकांना येत्या मंगळवारपर्यंत अर्जात दुरुस्ती करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी जाहीर केले आहे.
पुणे जिल्ह्यात 963 शाळांमध्ये 16 हजार 587 जागांच्या प्रवेशासाठी पहिल्या फेरीत 12 हजार 566 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी 8 हजार 984 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची लॉटरी काढण्यापूर्वी पालकांना अर्जातील चूका दुरुस्त करण्यासाठी संधी देण्यात आली आहे.
गुगल लोकेशन चुकल्यामुळे बहुसंख्य पालकांच्या मुलांना प्रवेशाची लॉटरी लागली नाही. या पालकांनी गुगल लोकेशन दुरुस्त करुन शाळांची निवड करणे आवश्यक आहे. जन्म दिनांक, नाव व इतर माहितीत कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही. अंतराच्या अडचणीमुळे पहिल्या फेरीत लॉटरी लागूनही प्रवेश न मिळू शकलेल्या पालकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जवळच्या पडताळणी समितीकडे जाऊन अर्जात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. पडताळणी समितीची यादी “आरटीई’ पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हवेली क्षेत्रातील पालकांनी जून्या जिल्हा परिषद इमारतीतील गटशिक्षणाधिकाऱ्यांची संपर्क साधावा, असे आवाहनही कुऱ्हाडे यांनी केले आहे.