RTE Admission Bribe Case – शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आकुर्डी येथे रंगेहात पकडले. पडताळणी केंद्रावरच ही कारवाई झाल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माउली गंगाराम जगताप (वय ३७, रा. चिंचवड नगर) याने तक्रारदार पालक (वय ३०) यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. संबंधित पालकाने आपल्या मुलीच्या आरटीई प्रवेशासाठी १६ मार्च रोजी ऑनलाईन अर्ज केला होता. २७ एप्रिल रोजी कागदपत्र पडताळणीसाठी ते आकुर्डीतील फकीरभाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळेत गेले असता अर्ज तांत्रिक कारणाने नाकारल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याच वेळी आरोपीने तक्रारदाराशी संपर्क साधला. अर्ज दुरुस्त करून प्रवेश निश्चित करून देण्याचे आमिष दाखवत त्याने ४० हजार रुपयांची मागणी केली. यामुळे पालकाने तत्काळ एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करून एसीबीने सापळा रचला. ३० एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास शाळेच्या पहिल्या मजल्यावर सापळा राबविण्यात आला. तक्रारदाराकडून ४० हजार रुपये स्वीकारताना आरोपीला पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईनंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. नागरिकांनी शासकीय कामासाठी कोणाकडूनही लाचेची मागणी झाल्यास त्वरित तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.