2025मध्ये आरएसएसला होणार 100 वर्ष पूर्ण, उद्यापासून वार्षिक बैठकीला सुरुवात

समलखा (हरियाणा) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची वार्षिक बैठक हरियाणातील समलखा येथे पट्टिकल्याणाच्या सेवा साधना आणि ग्राम विकास केंद्रात होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत. ही बैठक 12 ते 14 मार्च या कालावधीत होईल. बैठकीत पुढील वर्षाच्या रणनीतीवर विचारमंथन होणार असल्याचे समजते.
या बैठकीत आरएसएस वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा घेणार आहे आणि येत्या वर्षासाठी योजना बनवणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाचे 1400 हून अधिक प्रतिनिधी आगामी योजनांच्या सखोल विचारमंथनात सहभागी होणार आहेत.
दर वर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी ही सभा घेतली जाते. संघाच्या स्थापनेला 2025 मध्ये 100 वर्षे पूर्ण होत आहेत. संघाची स्थापना 1925 मध्ये विजयादशमीच्या दिवशी झाली. पुढचे वर्ष त्याचे शताब्दी वर्ष आहे. अशा स्थितीत हा बैठकीचा मुख्य मुद्दा होऊ शकतो.
या बैठकीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीचे प्रादेशिक आणि प्रांत कार्यकारी, प्रतिनिधी सभेचे निवडून आलेले सदस्य आणि सर्व विभाग प्रचारकांचा समावेश असतो. शिवाय देशातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक प्रतिनिधी असतो.
यातील बहुतांश प्रतिनिधी हे सक्रिय स्वयंसेवकांचे अखिल भारतीय प्रतिनिधी आहेत. सुमारे 50 सक्रिय स्वयंसेवकांचे प्रतिनिधित्व प्रांतीय प्रतिनिधीद्वारे केले जाते, तर प्रत्येक अखिल भारतीय प्रतिनिधीचे प्रतिनिधित्व 20 राज्य प्रतिनिधी करतात.





