बारामती : बारामती नगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केल्यानंतर नगरपालिकेतील गटनेते, उपगटनेते तसेच विविध समित्यांच्या प्रभारी पदांची निवड करण्यात आली. यावेळी रासप, दोन अपक्षांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सत्ता असलेल्या नगरपरिषदेत बळ वाढले आहे. या घडामोडींमुळे विरोधकांचा आवाज क्षीण होणार असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. या प्रक्रियेमुळे नगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशा परिस्थितीत नगरपालिकेतील निवडून आलेल्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाच्या नगरसेविका वनिता अमोल सातकर यांनी सहयोगी पक्ष राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. अपक्ष नगरसेवक निलेश भारत इंगुले व मनीषा संदीप बनकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देत सत्ताधारी गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची नगरपालिकेतील ताकद आणखी वाढली असून विरोधकांची संख्या कमी झाली आहे. परिणामी विरोधी पक्षनेतेपदाबाबतची चर्चा आता अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. राष्ट्रवादीला मिळालेल्या या पाठिंब्यामुळे आगामी काळात नगरपालिकेतील निर्णयप्रक्रियेत सत्ताधारी गटाचा प्रभाव अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे बारामतीतील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून पुढील काळात आणखी काही नगरसेवक सत्ताधारी गटात सामील होतील का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तेच्या सारीपाटावर विराजमान बारामती नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीला पहिल्यांदा सोपी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात चुरशीची झाली. निकालानंतर रासप, शरद पवार यांच्या पक्षाला एक, दोन अपक्ष असा कौल मिळाला होता. त्यामुळे बारामतीवर कमांड असलेल्या अजित पवार गटाला धक्का मानला जात होता. अपक्ष उमेदवारांची चर्चा निकालानंतर राज्यात गाजली होती. मात्र, नगरपरिषदेच्या समितींच्या पदांच्या निवडीत रासप, दोन अपक्ष नगरसेवकांनी सत्ताधारी पक्षाच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे नगरसेवक सत्तेच्या सारीपाटावर विराजमान झाले आहेत.