दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई – राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या दूध उत्पादकांना प्रति लीटर पाच रुपये अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये दोन रुपयांची वाढ करून ते सात रुपये देण्यात येईल. दूध उत्पादकांना दूध संघांनी ३.५ फॅट /८.५ एसएनएफ या प्रति करिता १ ऑक्टोबर २०२४ पासून २८ रुपये प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक आहे. त्यानंतर दूध उत्पादकांना शासनामार्फत सात रुपये प्रतिलिटर त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील. त्यामुळे या शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर ३५ रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहे.
ही योजना १ ऑक्टोबर २०२४ पासून राबवण्यात येईल. मात्र तिचा आढावा घेऊन मुदतवाढ देण्यात येईल. या योजनेसाठी ९६५ कोटी २४ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
धान उत्पादकांना दिलासा : प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर –
पणन हंगाम 2023-24 करिता धानाच्या भरडाईसाठी भात गिरणीधारकांना केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या भरडाई दराव्यतिरिक्त राज्य शासनाकडून प्रती क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
या निर्णयामुळे पणन हंगाम 2023-24 मध्ये खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईकरिता केंद्र शासनाकडून दहा आणि राज्य शासनाकडून चाळीस रुपये असे प्रती क्विंटल पन्नास रुपये इतका भरडाई दर योजनेत समाविष्ट भात गिरणीधारकांना मिळणार आहे. याकरीता अतिरिक्त 46 कोटी 55 लाख रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.



