दोन हजाराच्या 6,691 कोटी रुपयांच्या नोटा जनतेकडेच – आरबीआय

मुंबई – रिझर्व बँकेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जनतेने एकूण वितरित केलेल्या 98.12% इतक्या दोन हजार रुपयांच्या नोटा परत केल्या आहेत. मात्र अजूनही 6,691 कोटी रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा जनतेकडे आहेत. त्या परत घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
19 मे 2023 मध्ये रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यावेळी व्यवहारात साधारणपणे 3.56 लाख कोटी रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा होत्या. आता फक्त 6,691 कोटी रुपयांच्या नोटा शिल्लक राहिल्या आहेत. 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत कोणत्याही बँक शाखेत या नोटा परत करता येत होत्या.
त्यानंतर रिझर्व बँकेच्या 19 कार्यालयामध्ये या नोटा परत करता येत आहेत. कोणत्याही पोस्ट कार्यालयातून नागरिक या नोटा रिझर्व बँकेच्या संबंधित कार्यालयाकडे पाठवू शकतात. केंद्र सरकारने नोटबंदीनंतर नोव्हेंबर 2016 मध्ये दोन हजार रुपयाची नोट सुरू केली होती. त्या अगोदर 1,000 आणि 500 रुपयाची जुनी नोट बंद करण्यात आली होती. उरलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा लवकरच परत येतील असे रिझर्व बँकेने म्हटले आहे.





