इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी 526 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

पुणे : इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आणि नदीच्या सौंदर्यीकरणाला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय तांत्रिक समितीने दोन मलनि:स्सारण प्रकल्पांना (एसटीपी) मंजुरी दिली आहे. एकूण 526 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पांतर्गत नदीसंवर्धन, पूरनियंत्रण, पाण्यावर प्रक्रिया आणि नदीकाठचे सौंदर्यीकरण अशा चारही बाबी साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती ट्विटद्वारे (एक्स) जाहीर केली असून, या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमृत 2.0 अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पांमध्ये 40 एमएलडी आणि 20 एमएलडी क्षमतेचे दोन मलनि:स्सारण प्रकल्प उभारले जाणार आहेत. यामध्ये पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी जलनि:स्सारण प्रणाली, प्रदूषित पाणी मलनि:स्सारण प्रकल्पाकडे वळवण्यासाठी इंटरसेप्टर, पूर नियंत्रणासाठी दगडी बांधकामाद्वारे नदीच्या तटांचे सक्षमीकरण आणि नदीपात्राचे तटबंदीकरण यांचा समावेश आहे. याशिवाय, नदीच्या काठावर हरित क्षेत्राचा विकास आणि वनसंवर्धनाद्वारे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.
इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी 2 मलनि:स्सारण प्रकल्पांना (एसटीपी) आज राज्यस्तरिय तांत्रिक समितीकडून मंजुरी देण्यात आली, हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. या प्रकल्पातून नदीसंवर्धन, पूरनियंत्रण, पाण्यावर प्रक्रिया आणि सौंदर्यीकरण अशा चारही बाबी साध्य केल्या जाणार आहेत. एकूण…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 18, 2025
“इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. यामुळे नदीचे संवर्धन होईलच, शिवाय पूर नियंत्रण आणि सौंदर्यीकरणामुळे स्थानिकांना स्वच्छ आणि सुंदर पर्यावरणाचा लाभ मिळेल,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटमध्ये नमूद केले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात लक्षणीय घट होईल आणि नदीकाठच्या परिसराचे पर्यावरणीय आणि सौंदर्यात्मक मूल्य वाढेल, अशी अपेक्षा आहे. स्थानिक नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून, लवकरात लवकर प्रकल्पाची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी केली आहे.

