अपघात झाल्यास वारकऱ्याला 4 लाखांची मदत; महसुल विभागाकडून परिपत्रक जारी

मुंबई : विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी जाणारे हजारो वारकरी मोठे अंतर कापत पंढरपुरात येतात. राज्य शासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून वारीदरम्यान कोणत्याही प्रकारच्या अपघातात वारकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून 4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासंदर्भातलं नवे परिपत्रक महसूल विभागाने मंगळवारी जाहीर केले.
या निर्णयामुळे वारीदरम्यान घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमध्ये वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळणार आहे. १६ जून ते १० जुलै २०२५ या कालावधीत वारीदरम्यान जर एखाद्या वारकऱ्याचा अपघात, विषबाधा किंवा इतर नैसर्गिक कारणामुळे मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबीयांना ही रक्कम मिळणार आहे. मात्र आत्महत्येच्या घटनांमध्ये ही मदत लागू होणार नाही.
याशिवाय, वारीदरम्यान अपघातामुळे अपंगत्व आल्यास देखील आर्थिक मदतीची तरतूद आहे. शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार, विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरता ही मदत लागू करण्यात आली आहे. आत्महत्या, विषबाधा तसेच खून वगळून इतर नैसर्गिक मृत्यू अपघाताने झालेल्या दुर्घटनांमध्ये ही आर्थिक मदत शासनाच्या वतीने दिली जाणार आहे.
मदतीची तरतूद काय?
१- अपघाताने व दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसदारांना ४ लाखांची मदत
२ – वारीदरम्यान अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ७४ हजारांची मदत
३ – ६० टक्क्यांवरून अधिक अपंगत्व आल्यास २.५० लाखांची मदत
४ – एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी हॉस्पीटलमध्ये दाखल झाल्यास १६ हजार रुपये तर एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी दाखल असल्यास ५४०० रुपयांची मदत





