पुणे जिल्हा | कनेरसरमधील आर.आर. काॅलनीत ८५ घरांच्या दुरूस्ती कामाचा शुभारंभ

दावडी, (वार्ताहर) – कनेरसर (ता.खेड) येथील आर. आर. काॅलनीमधील ८५ घरांच्या दुरूस्ती कामाचा शुभारंभ करण्यात आला. खेड सिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे अभियंता नंदु दुशिंग,संभाजी पावडे,
सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे, कनेरसरच्या सरपंच सुनीता केदारी, जयप्रकाश दौंडकर, सुरेखा टाव्हरे, टाकळकर अॅन्ड सन्सचे कुणाल टाकळकर,बाळासाहेब खंडागळे,सुरेश गावडे, अमोल नाईकरे, मयुर मांजरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
एमआयडीसी कार्यालय,पुणे येथे डाॅ.अर्चना पठारे यांनी दि.१२ जून रोजी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी खेड सिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा यांनी तातडीने काम सुरू करण्याची ग्वाही दिली होती.
त्यापूर्वी दि.५ मार्च रोजी कनेरसर येथे एमआयडीसी,खेड सिटी व ग्रामस्थ यांनी संयुक्त पाहणी केली होती.
आर. आर. काॅलनीतील घरांची दुरवस्था याबाबत खेड सिटीने काॅलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे यांना स्ट्रक्चरल ऑडीटचे काम दिले होते, त्याची पूर्तता होऊन आठवड्यात वाॅटर प्रुफींग, भिंतीना गेलेले तडे,पाणी गळती या समस्या पूर्तीबाबत प्रत्यक्ष कामास सुरुवात होत आहे.
त्यासाठी दीड कोटी रूपये खर्च येणार असल्याचे खेड सिटीच्या वतीने सांगण्यात आले. सरपंच सुनीता केदारी यांनी प्रास्तविक केले.
यावेळी अशोकराव टाव्हरे यांनी आदिवासी ठाकर समाजाची घरे नूतनीकरण करण्यासाठी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी डाॅ. अर्चना पठारे,खेड सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा, उपाध्यक्ष शाम देशपांडे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

