नवी दिल्ली – उद्योजकाची संघटना असलेल्या फिक्की या संघटनेच्या अध्यक्षपदी आरपीजी समूहाचे उपाध्यक्ष अनंत गोयंका यांची निवड झाली आहे. त्यांनी शनिवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून ते 2025- 26 या वर्षासाठी या पदावर काम करणार आहेत. इमामी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष हर्षवर्धन अग्रवाल अगोदर या पदावर कार्यरत होते. त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर या पदावर अनंत गोयंका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोयंका यांनी आपले पदवी आणि एमबीएचे शिक्षण अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठात पूर्ण केले आहे. सध्याचा काळ भारतीय उद्योगाच्या स्थित्यंतराचा काळ असून आपण आगामी काळात उद्योगांचे आणि उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू असे गोयंका यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले. उद्योगासमोर असलेल्या अडचणी आपण योग्य व्यासपीठावर मांडू आणि ह्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय उद्योगांना देशात आणि परदेशात भांडवल उभारण्यासाठी येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.