नवी दिल्ली – ईशर मोटारची उप कंपनी असलेल्या रॉयल इन्फिल्डने थायलंडमध्ये उत्पादन सुरू केले आहे. या कंपनीकडून बुलेट मोटरसायकल निर्माण केली जाते. रॉयल इनफिल्ड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी गोविंदराजन यांनी म्हटले आहे की, भारतामध्ये आमच्या उत्पादनांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता आम्ही विस्तारीकरण हाती घेतले आहे.
पूर्व गोलार्धातील देशांना आमचे उत्पादने सहज उपलब्ध व्हावी याकरिता थायलंडमध्ये उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या कंपनीने अर्जेंटिना, कोलंबिया, ब्राझील, बांगलादेश आणि नेपाळमध्ये आपले उत्पादन प्रकल्प सुरू केले आहेत. थायलंडमध्ये मध्यम आकाराच्या आमच्या उत्पादनांना चांगली माग णी आहे.
त्याचबरोबर थायलंड लगतच्या देशांना ही उत्पादने सहज उपलब्ध होऊ शकतील असे कंपनीचे मुख्य व्यवसाय अधिकारी यादव इंदरसिंह गुलेरिया यांनी सांगितले. थायलंडमधील प्रकल्पाची उत्पादन क्षमता सध्या 30 हजार युनिट असून आगामी काळात यात वाढ करण्याची शक्यता खुली ठेवण्यात आली आहे.