रोईंगपटू दत्तू भोकनाळ हायकोर्टाचा दिलासा; कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द

मुंबई: पत्नीने दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला भारताचा आघाडीचा रोईंगपटू दत्तू भोकनाळ याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्याच्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्यात तथ्य नसल्याचा निर्वाळा देत आयपीसी कलम 498(ए) अंतर्गत कौटुंबिक हिंसाचार आणि कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा दाखल केलेला गुन्हा रद्द केला.
भारताचा आघाडीचा ऑलिम्पियन आणि आशियाई खेळात सुवर्ण पदक विजेता दत्तू भोकनाळ विरूद्ध त्याच्या पत्नीने नाशिक पोलिसांत आपल्या पतीने आपला प्रचंड मानसिक आणि शारिरीक छळ केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार दत्तू भोकनाळ विरोधात आयपीसी कलम 498(ए) अंतर्गत कौटुंबिक हिंसाचार आणि कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलियात होणा-या आंतरराष्ट्रीय रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत भोकनळला सहभागी होता यावे म्हणून त्याने उच्च न्यायालयात धाव घेऊन आपल्यावरील गुन्हे रद्द करावेत, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात केली होती.
या याचिकेवर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी दत्तू भोकनाळ याच्यावतीने ऍड.रवीराज परामणे आणि ऍड. वैभव गायकवाड यांनी बाजू मांडली. भोकनळ याने या महिलेबरोबर आळंदी येथे वैदीक पध्दतीने विवाह केल्याचे मान्य करताना तिची कोणत्याही प्रकारे फसवणूक केली नसल्याचा दावा केला. याची दखल न्यायालयाने घेतली. जर विवाह त्याने मान्य केला असेल आणि त्याच्याकडून अथवा कुटूंबाकडून हुंडा किंवा इतर कोणत्याही कारणासाठी छळ केल्याचे कुठेच सिद्ध होत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने गुन्हा रद्द केला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करण्याचा दत्तू भोकनळचा मार्ग मोकळा झाला आहे.





