५ एप्रिल 1930, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचा दिवस. 12 मार्च या दिवशी गांधीजींनी सुरू केलेली यात्रा भल्या सकाळी दांडी या छोट्या गावात पोचली. तिथे जमलेल्या जनसमूहाशी बोलताना गांधीजी म्हणाले, “आज तुम्ही शपथ घ्या की, सरकारने पुरविलेले मीठ तुम्ही खाणार नाही. तुमच्या उंबरठ्याशी एवढी मोठी मिठाची खाण पसरली आहे.’ त्यानंतर गांधीजींबरोबर असलेल्या हजारो माणसांनी समुद्राचे पाणी मिठागरात भरले. ते पाणी उकळून त्याचे मीठ तयार करण्यात आले. ब्रिटिश पोलिसांनी गांधीजींसह अनेक सत्याग्रहींना अटक केली. अनेकांवर लाठीमार केला. त्या अमानुष मारहाणीमुळे लोक जमिनीवर पडले तर सत्याग्रहींची पुढची तुकडी तयार असे. लोक संपेनात. आंदोलन थांबेना, अशी इतिहासात नोंद आहे. त्या दिवशी उन्हाचा प्रचंड कडाका होता. ब्रिटिश पोलीस मारून मारून थकून गेले. एका अमेरिकन पत्रकाराची नोंद आहे की, बऱ्याच सत्याग्रहींच्या डोक्याच्या कवट्यांना चिरा पडल्या होत्या. काहीजणांचा मृत्यूही झाला. मिठाचा सत्याग्रह सुरू होण्यामागची पार्श्वभूमी जाणून घेतल्याशिवाय इंग्रजांची लबाडी, निष्ठुरपणा नीट लक्षात येणार नाही. एका वर्षी बंगालमधे फारच कमी पीक आले. पुढच्या वर्षी तर अजिबात पीक आले नाही व त्यामुळे बंगालात दुष्काळ पडला. शेतात धान्य पिकले नाही तर पैसे देऊन धान्य विकत घेता आले असते, पण ईस्ट इंडिया कंपनीने लुटालूट करून तेथील जनतेला दरिद्री केले होते. लोक मृत्युमुखी पडू लागले. म्हणून मग जिवंत लोकांकडून सारावसुली इतकी निर्दयपणे करण्यात आली की, शेतकऱ्यांना बियाणासाठी ठेवलेले धान्य विकण्याची पाळी आली. मोठ्या प्रमाणात सारा गोळा करण्यात आला. परिणामी पुढील बरीच वर्षे भारतीय माणसे जिवंत असली तरी मृतप्राय झाली होती व सतत आजारी असत. लहान मुलांची वाढ खुंटली. कारण तांदळावरही अफाट कर लादून साडेसहा आणेनी घेतलेला तांदूळ ब्रिटिश सरकार अवाढव्य किमतीत विकू लागले. शेतीबरोबरच कंपनीने मिठाच्या उत्पादनाचा ताबा आपल्याकडे घेतला. मिठावरील कामगार व मलंगी (स्वतःची मिठागरे असणारे) यांचे निर्दयपणे शोषण होऊ लागले. पिढ्यान् पिढ्या ज्यांच्या कुटुंबात स्वतंत्रपणे मिठाचे उत्पादन होत होते, अशा साठ हजार कामगारांच्या जमिनी बळकावल्या गेल्या. 1866 मध्ये पडलेल्या दुष्काळात पहिला या लोकांचा बळी गेला. या दुष्काळात पन्नास लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर मिठातून आणखी महसूल मिळावा म्हणून मिठागरांसाठी इंग्रजांनी सीमा कुंपणाची निर्मिती केली. सन 1869-70 या वर्षात मीठ कर व सरकारी मीठ उत्पादनातील नफा मिळून चार कोटी पस्तीस लाख इतकी मिळकत कंपनीला झाली. हे सर्व आकडे साधारण दीडशे वर्षांपूर्वीचे आहेत हे लक्षात घेता कंपनी भारतातल्या जनतेकडून किती प्रचंड प्रमाणात वसुली करीत होती हे लक्षात येईल. मिठाचा कर भरला नाही तर पाचशे रुपये दंड किंवा सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा होती. 1879 मध्ये धाकदपटशा दाखवून कंपनीने अनेक मीठ उत्पादन क्षेत्रे ताब्यात घेतली. 1876 ते 78 या दरम्यान भारतात पासष्ट लाख लोक पुरेशा अन्नाअभावी मृत्यू पावले. ब्रिटिशांनी ठरवलेला मिठावरचा भरमसाठ कर कुणालाही टाळता येऊ नये, म्हणून भारतासारख्या खंडप्राय देशात मिठागरांभोवती एक लांबच लांब कुंपण निर्माण केले गेले व त्यावर अहोरात्र पहारा ठेवला. हा पहारा कशासाठी, तर सहज परवडणारी, जगण्यासाठी अत्यंत गरजेची मिठासारखी वस्तू लोकांपासून पूर्णपणे तोडण्यासाठी. कुणी खासगीत मीठ तयार करीत नाही ना, हे शोधण्यासाठी एखादे मादक द्रव्य किंवा नशिल्या पदार्थांचा तपास करावा तसा घराघरात घुसून तपास केला जाई. त्यावेळी बायकांशी असभ्य वर्तन केले जाई. एखादी वस्तू पळवून नेली जाई. मोठा दंड केला जाई. तुरुंगात टाकले जाई. खेड्यातील मजुरांच्या कुटुंबाला सरकारकडून मीठ विकत घेण्यासाठी मोजावी लागणारी किंमत ही त्यांच्या दोन महिन्यांच्या उत्पन्नाइतकी होती. त्यामुळे कित्येक गरीब लोकांना मीठ विकत घेऊन खाता येत नसे. मीठ न खाल्ल्याने महामारी, अतिसार इत्यादी जीवघेण्या रोगांची प्रतिकारशक्ती भारतीय लोकांना मिळेना व त्यामुळे खूप मृत्यू होऊ लागले. तरीही मिठागरांवरील पूर्ण देशातून गेलेली सीमा शुल्क कुंपण रेषा हटवली गेली नाही. मीठ पोटात न गेल्यामुळे ताप व पोटाच्या तक्रारीने बळी गेलेल्या लोकांच्या मृत्यूचे कारण मात्र भूकबळी, अतिसार किंवा इतर आजारांमुळे झाल्याची नोंद होत असे. 1930 मधे दांडी यात्रा निघाली तेव्हा मिठावर सव्वा रुपया कर होता. चलनवाढीमुळे मजुरांची बारा रुपयांपर्यंत मजुरी वाढली होती, पण मुळात मिठाला पाण्याखेरीज काही लागत नसल्याने हा कर गांधीजींना अन्यायकारक वाटत होता. दक्षिणेला 241 मैलांवर असलेल्या दांडीपर्यंत चालत जाताना वाटेत असंख्य अनुयायी या दांडीयात्रेत सहभागी झाले. त्यानंतर दोन महिने सर्व भारतभर मिठाचा साठा असलेल्या अनेक ठिकाणी ब्रिटिशांनी धाड घालून शेकडो लोकांना अटक केली, काही मृत्यू पावले व कित्येकजण जखमी झाले. निःशस्त्र सत्याग्रहींवर ब्रिटिशांनी मिठासाठी केलेल्या अत्याचारांमुळे जगभरात ब्रिटिशांची नामुष्की झाली. मिठासारख्या औषधी, जीवनावश्यक व उत्पादनासाठी काहीच भांडवल न लागणाऱ्या वस्तूवर कर असताच कामा नये अशी गांधीजींची मागणी होती, पण ब्रिटिशांनी ती मान्य केली नाही. मिठावरील कर थोडा कमी केला व मीठ उत्पादन क्षेत्रातील लोकांना त्यांच्या वापरासाठी लागणारे मीठ बनवण्याची परवानगी देण्यात आली. या मिठाच्या सत्याग्रहाने अहिंसक चळवळीबद्दल निर्माण झालेला विश्वास आणि चळवळीला मिळालेली प्रसिद्धी यामुळे भारतीय राजकारणाची दिशा बदलली. – माधुरी तळवलकर