– एकनाथ आव्हाड संकेतचा इयत्ता सातवीचा आणि सुलभाचा इयत्ता पाचवीचा वार्षिक परीक्षेचा रिझल्ट लागला. नेहमीप्रमाणे संकेत याही वर्षी वर्गात पहिला आणि सुलभा वर्गात तिसरी आली होती. घरी येऊन दोघांनी त्यांचे प्रगतीपुस्तक आजी-आजोबा आणि आई-बाबांना दाखवले. सगळ्यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले. आई तर पटकन म्हणालीसुद्धा, “माझी गुणाची मुलं. आज तुमच्यासाठी खास आमरस पुरीचा बेत करू.” पण सुलभा काहीशी नाराजीनेच म्हणाली, “अगं आई, पण संकेतदादासारखी मी वर्गात थोडीच पहिली आलीय. मी तर वर्गात तिसरी आलीय.” आई म्हणाली, “अगं तिसरा क्रमांक मिळवणं हेसुद्धा सोपं नाही बाळा. त्याच्यासाठीही खूप अभ्यास करावा लागतो. आणि परीक्षेतील गुण, टक्के हेच सर्वकाही नसतं सुलभा. तू किती छान गाणं गातेस; अगदी ऐकत राहावं असं. गेल्यावर्षी गाण्याच्या स्पर्धेत तू भाग घेतलास तेव्हा संपूर्ण जिल्ह्यात तू पहिली आली होतीस. हे विसरू नकोस.” आजी-आजोबा, बाबा आणि संकेतनेसुद्धा सुलभाला समजावून सांगतले. सुलभालाही आता सर्वांचे म्हणणे पटले. तिची नाराजी दूर झाली. ती हसून पटकन म्हणाली, “आजचा आनंद आहेच खास, आमरस पुरीचा बेत होणार झकास.” यावर सगळेच हसले. तेवढ्यात संकेत बाबांना म्हणाला, “ बाबा मी आता आठवीत गेलो आणि सुलभा सहावीत मग आमच्या गेल्या वर्षीच्या पुस्तकांचं काय करू?” बाबा म्हणाले, “अरे, ती पुस्तकं तुम्ही तुमच्या शाळेत जमा करायला हवीत. म्हणजे त्या त्या इयत्तेतील मुलांना ती पुढे उपयोगी पडतील.” “हो बाबा, उद्याच देऊन येतो मी शाळेत.” तेवढ्यात आजी म्हणाली, “ संकेत आणि सुलभा, तुम्ही दोघांनीही तुमच्या वर्षभर वापरलेल्या वह्या रद्दीत टाकण्यापूर्वी त्यातील कोरी पानं वेगळी करा. त्या कोऱ्या पानांना एकत्र करून तुमचे आजोबा तुम्हाला त्याच्या छान वह्या करून देतील.” सुलभा म्हणाली, “आजी छानच आयडिया सांगितलेस ग.” आजोबा म्हणाले, “संकेत सुलभा, अरे तुम्हाला माहीत आहे का? कागद हा झाडांपासून तयार केला जातो. म्हणजे विचार करा, कागद तयार करायला कितीतरी झाडे तोडावी लागतात. झाडे ही आपली नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. तिचा पण काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. झाडापासून कागद होतो म्हणून कागदाचासुद्धा आपण काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. “ बोलता बोलता आजूबांनी केवढी महत्त्वाची माहिती आज आपल्याला दिली याची जाणीव संकेत, सुलभाला झाली. आजोबा म्हणाले, “आणखी एक गोष्ट, तुम्हा दोघांना आता उन्हाळ्याची सुट्टी लागेल. या सुट्टीत तुम्ही घरातील सगळी जुनी वर्तमानपत्र आणि तुमच्या वापरलेल्या जुन्या वह्या यावेळी रद्दी पेपरवाल्याकडे तुम्हीच जाऊन द्यायच्या बरं. काय किलोने रद्दी पेपर विकले जातात? आपले किती किलो रद्दी पेपर भरले? हे तुम्ही नीट पाहायचं. पेपरवाल्याकडून त्याचा व्यवस्थित हिशोब घ्यायचा. कराल ना एवढं काम? सुलभा संकेत दोघे म्हणाले, “हो आजोबा, आम्ही नक्की करू.” सुलभा संकेतने दुसऱ्या दिवशी सर्वप्रथम आपली जुनी पुस्तके शाळेत नेऊन दिली. त्यानंतर घरी येऊन आजोबांनी दिलेल्या कामाला ते लागले. घरातले सगळे रद्दी पेपर एकावर एक त्यांनी नीट रचून ठेवले. सुतळीने ते बांधले. वापरलेल्या जुन्या वह्यांमधील कोरी पाने आजोबांच्या मदतीने वेगळी करून मग त्या वापरलेल्या वह्या रद्दी पेपरसोबत विकण्यासाठी ठेवल्या. हे काम झाल्यावर घरातली साफसफाई करण्यासाठी दोघांनी आईला मदतसुद्धा केली. आता रद्दी पेपरवाला आला की त्याला ही सगळी रद्दी द्यायची, असे ठरले. पण दोन-तीन दिवस रद्दी पेपरवाला आलाच नाही. एके दिवशी मित्रांसोबत संकेत बाहेर खेळायला गेल्यावर घरी येताना दारात त्याला रद्दी पेपरवाला दिसला. पण आज घरात फक्त सुलभा आणि संकेतच होते. आई-बाबा आणि आजी-आजोबा नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते. घरात कोणीच मोठं माणूस नाही मग आपण ही रद्दी विकावी का? हा दोघांनाही प्रश्न पडला. पण शेवटी संकेतला आजोबांचे शब्द आठवले. आजोबा म्हणाले होते, ‘ तुम्ही दोघांनीच यावेळी रद्दी पेपर विकायचे.’ ठरलं तर मग. संकेतने आधी रद्दी पेपरवाल्याला रद्दीचा एक किलोचा भाव विचारला. रद्दी पेपरवाला दहा रुपये किलो म्हणाला. पण संकेतने रद्दी पेपरचा सध्याचा दर बारा रुपये किलो आहे, ही माहिती आधीच मिळवली होती. संकेत त्या रद्दी पेपरवाल्याला म्हणाला, “ बारा रुपये किलोने घेत असेल तरच तुला आम्ही रद्दी पेपर देऊ.” हो नाही करता करता रद्दी पेपरवाला तयार झाला. त्याने त्याच्या वजन काट्याने सगळ्या रद्दी पेपरचे वजन केले. दोघांनी काळजीपूर्वक ते वजन पाहिले. सगळे मिळून दहा किलो वजन झाले. सुलभा लगेच म्हणाली, “ एकशे वीस रुपये झाले.” त्याने दोनशे रुपये ची नोट संकेतकडे दिली पण घरात सुट्टे पैसे नव्हते. संकेत म्हणाला, “हे दोनशे रुपये नकोत. तुम्ही सुट्टे एकशे वीस रुपये आम्हाला द्या. आमच्याकडे तुम्हाला द्यायला ऐंशी रुपये नाहीत.” तो माणूस म्हणाला, “ मी खाली जाऊन सुट्टे पैसे घेऊन येतो.” संकेत म्हणाला, “ठीक आहे, या तुम्ही सुट्टी पैसे घेऊन.” तो माणूस रद्दी पेपर घेऊन जायला लागला. तेव्हा संकेत म्हणाला, “नाही नाही पेपर घेऊन जाऊ नका. आधी पैसे घेऊन या मगच पेपर घेऊन जा.” तो माणूस म्हणाला, “ एवढा विश्वास नाही का आमच्यावर.’ संकेत म्हणाला, “ इथे विश्वासाचा प्रश्नच नाही, व्यवहार आहे हा. आधी पैसे द्या, मग रद्दी न्या. तुम्ही पैसे द्यायला इथे पुन्हा येणार आहातच ना.” तो माणूस तणतणतच खाली गेला. थोड्यावेळाने सुट्टे एकशे वीस रुपये घेऊन आला. संकेतने पैसे घेतले आणि मग रद्दी पेपर त्या माणसाला दिले. संध्याकाळी आजी-आजोबा, आई-बाबा घरी आल्यानंतर सुलभाने घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. आई म्हणाली, “ मुलं मोठी झाली बरं आपली. अभ्यासातली हुशारी त्यांच्या जीवनातसुद्धा उतरलीय.” आजोबा पटकन म्हणाले, “ मुलांनो, मी दिलेल्या परीक्षेत तुम्ही पास झालात बरं. अरे, तो रद्दी पेपरवाला मीच पाठवला होता तुमची परीक्षा घ्यायला.” सारं घर चकीत झालं. आजी लगेच म्हणाली, “ माझी नातवंडं आहेतच भारी, त्यांच्यासाठी करा बरं आज खीरपुरी.” यावर सुलभा आणि संकेत जाम खुश झाले.