रोहित शेट्टीच्या ‘कॅाप युनिव्हर्स’मधील चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात; हा अभिनेता असणार ‘कॅाप’च्या भूमिकेत

Rohit Shetty | John Abraham | दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याचा कॅाप युनिव्हर्समधला पुढचा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिंघम, सिंघम रिटर्न, सर्यवंशी असे कॅाप युनिव्हर्समधील चित्रपट रोहित शेट्टीने दिले आहेत. या चित्रपटांमध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका सर्वप्रथम अभिनेता अजय देवगणने साकारली होती. त्यानंतर अभिनेता अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांच्या वाट्याला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आली होती. आता शेट्टीच्या पुढच्या चित्रपटात एका नव्या अभिनेत्याला त्याच्या आगामी चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्याची संधी मिळणार आहे.
अभिनेता जॅान अब्राहम रोहित शेट्टीच्या पुढच्या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. जॅान अब्राहम आणि रोहित शेट्टी या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे. रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘अॅक्शनियर’ असल्याचे सांगितले जात आहे.
या चित्रपटात अभिनेता जॅान अब्राहम पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असून चार महिने चित्रपटाचे शूटिंग चालणार आहे. मुंबईतील ४० वेगवेगळ्या ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केले जाणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित आणि जॉन अब्राहम १८ एप्रिलपासून ‘अॅक्शनियर’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहेत.
जॉन अब्राहमने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तो रोहित शेट्टीचा चित्रपट करत आहे आणि त्याची कथा खूप खास आहे. आता बातमी अशी आहे की रोहित शेट्टी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर आधारित ‘अॅक्शनियर’ नावाचा चित्रपट बनवत आहेत.
या चित्रपटात १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांच्या तपासापासून ते २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांपर्यंतची कथा दाखवली जाणार आहे. नुकताच जॉन अब्राहमने त्याच्या ‘डिप्लोमॅट’ चित्रपटाचे प्रमोशन करताना सांगितले होते की, त्याला शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचा प्रीक्वल हवा आहे. या प्रीक्वेलमध्ये, त्याच्या जिम या पात्राची कथा तपशीलवार दाखवता येईल. ‘पठाण’ मध्ये जॉनने जिम नावाच्या खलनायकाची भूमिका साकारली होती.





