#IPL2022 | रोहित शर्माच्या खराब कामगिरीचं ग्रॅमी स्मिथनं सांगितलं कारण, म्हणाला..

मुंबई – आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा नेतृत्वासह वैयक्तिक कामगिरीतही अपयशी ठरत आहे. मात्र, त्याला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने पाठिंबा दिला आहे. रोहितकडे भारताच्या तीनही क्रिकेट संघांचे नेतृत्व आहे. त्यातच त्याच्याकडे मुंबई इंडियनसचेही कर्णधारपद आहे. याचाच ताण त्याच्यावर आहे त्यामुळेच तो सध्या अपयशी ठरत आहे, असे मतही स्मिथने व्यक्त केले आहे.
रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. मात्र यंदा त्यांची अपयशी कामगिरी खंडित होताना दिसत नाही. रोहित सध्या कसोटी, एकदिवसीय तसेच टी-20 या भारताच्या तिन्ही प्रकारच्या संघाचे नेतृत्व करत आहे. त्याचा मानसिक ताण रोहितवर आला असून याचे परिणाम आयपीएलमध्ये दिसत आहेत, असेही त्याने म्हटले आहे.
दरम्यान, आयपीएल स्पर्धेत यंदाच्या मोसमात सलग सहा पराभव स्वीकारलेल्या मुंबई इंडियन्सला आता या परिस्थितीतही प्लेऑफला पात्र व्हायचे असेल तर त्यांना पुढील आठही सामने जिंकावे लागतील. तसेच त्यात सरस नेटरनरेटही ठेवावा लागेल. पहिले काही सामने गमावूनही विजेतेपद पटकावण्याची किमया मुंबईने 2015 साली केली होती. त्यावेळीही स्पर्धेत 10 संघ होते. यंदाही स्पर्धेत दोन नव्या संघांमुळे 10 संघ सहभागी झालेले आहेत.
अशा स्थितीत 16 गुण झालेले संघ प्लेऑफला पात्र ठरतील. त्यामुळे मुंबईसाठी ही एकच अखेरची संधी आहे. यंदाच्या मोसमात कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे.





