Rohit Sharma : आयपीएल 2026 स्पर्धेत दिग्गज खेळाडूंचा संघ असूनही मुंबई इंडियन्स संघाची (Rohit Sharma) आतापर्यंत पुरती वाट लागली आहे. संघाने आतापर्यंत 7 सामन्यांपैकी केवळ 2 सामन्यात विजय मिळवला असून, उर्वरित 5 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. यामुळे प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे अत्यंत कठीण झाले असून, उर्वरित प्रत्येक सामना जिंकणे MI साठी अत्यावश्यक बनले आहे. फलंदाजी विभागात आश्वासक सुरुवात मिळवण्यासाठी अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याची प्रकर्षाने उणीव भासत आहे. 29 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. या महत्वाच्या लढतीपूर्वी रोहित शर्मा खेळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) मागील काही सामन्यांमध्ये दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात त्याला हमस्ट्रिंग इंजरी झाली होती. त्यानंतर पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये तो खेळला नव्हता. मुंबई इंडियन्सच्या प्रवक्त्याने पत्रकार परिषदेत रोहित शर्माच्या फिटनेसबाबत अपडेट देताना सांगितले की, रोहित वेगाने बरा होत आहे. मात्र, हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात तो खेळेल की नाही, याचा अंतिम निर्णय नाणेफेकीच्या वेळी घेण्यात येईल. या वक्तव्यातून रोहित हैदराबादविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत आहेत. Rohit Sharma रोहित शर्माने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करत आपला फॉर्म दाखवला होता. मात्र, दुखापतीमुळे त्याला तीन सामन्यांना मुकावे लागले.आता हैदराबादनंतर मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना 2 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट होण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला 103 धावांनी दणदणीत पराभूत केले होते. चेन्नईने 20 षटकांत 6 गडी गमावून 207 धावा केल्या होत्या, तर मुंबई इंडियन्सचा संघ 104 धावांत सर्वबाद झाला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्सला पुढील सामन्यांत मोठी झुंज द्यावी लागणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) परतीमुळे मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीला स्थिरता मिळेल, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत MI ला सलग विजयांची मालिका साध्य करणे गरजेचे आहे.