चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार? BCCI ने भारतीय कर्णधाराकडे थेट स्पष्टीकरणच मागितले

Rohit Sharma: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने गेल्यावर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती. भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला होता. आता चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरही रोहितकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्याकाही दिवसांपासून रोहित शर्मा फॉर्ममध्ये नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यातही त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे त्याच्यासाठी आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा महत्त्वाची असणार आहे. बीसीसीआयने देखील रोहितकडे त्याच्या भविष्यातील प्लॅनबाबत विचारणा केली आहे.
रिपोर्टनुसार, बीसीसीआयने रोहितला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याच्या भविष्यासंदर्भात स्पष्टता देण्यास सांगितल्याचे समजते. बीसीसीआयकडून 2027 च्या वर्ल्ड कपसाठी आतापासूनच रणनीती आखली जात आहे. यासाठी बोर्डाकडून संघ तयार केला जात आहे. त्यामुळे आता रोहितच्या भविष्यासंबंधी निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
बीसीसीआय2027 च्या वर्ल्ड कप आधीच वनडे आणि कसोटी या दोन्ही फॉरमॅटमध्ये स्थायी कर्णधार शोधण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे बोर्डाकडून रोहितला याबाबत माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, विराट कोहलीच्या बाबतीत मात्र व्यवस्थापन आणखी थोडा वेळ वाट पाहण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, 19 फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळला जाईल. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणारा रोहित आणि विराट या दोन्ही प्रमुख खेळाडूंवर दबाव असेल. या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीवरच त्यांच्या निवृत्तीबाबतचा निर्णय ठरण्याची शक्यता अधिक आहे.





