बारामती : कर्जत-जामखेड मतदारसंघातील कुकडी तर बारामती आणि पुरंदर तालुक्यांसाठी जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्यासाठी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आठच दिवसांत दुसऱ्यांदा पुण्यात सिंचन भवनमध्ये ठिय्या देऊन त्यांनी प्रशासनाची पंचाईत केली आणि या दोन्ही योजनांसाठी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन घेतले. त्यानुसार कुकडी कालव्यातून २५ मे रोजी तर जनाई-शिरसाईसाठी २२ मे रोजी पाणी सोडण्यात येणार आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कुकडीचे दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली असून त्यासाठी त्यांनी यापूर्वी पत्रव्यवहारही केला आहे. परंतु अद्यापही पाणी सोडण्यात आलेले नव्हते. त्यामुळे गेल्या आठवड्यात पुण्यात सिंचन भवनमध्ये शेतकऱ्यांसह त्यांनी बैठक घेतली होती आणि तत्काळ पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यावर २८ मे रोजी पाणी सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. परंतु त्यापूर्वीच पाणी सोडण्याची आग्रही मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. परंतु याबाबत काहीही निर्णय न झाल्याने त्यांनी गुरुवारी शेतकऱ्यांसह पुन्हा सिंचन भवन गाठले आणि २५ मेपासून आवर्तन सोडण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून घेतले आहे. बारामती इंदापूरसह दौड आणि पुरंदर तालुक्यासाठी असलेल्या जनाई-शिरसाईच्या प्रश्नाचे स्वरुप तर वेगळेच आहे. पुण्याचे पालकमंत्री असताना अजित पवार यांचे जिल्ह्यातील प्रत्येक प्रश्नाकडे बारकाईने लक्ष होते आणि अभ्यासही होता. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही प्रश्नावर ते संबंधित सर्व घटकांची एकत्रित बैठक घेऊन त्या प्रश्नातून सहज मार्ग काढत होते. परंतु आता परिस्थिती बदलली असून अजित पवार यांच्या दुदैवी निधनानंतर त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सध्या पुण्याच्या पालकमंत्री आहेत. राजकारणात अचानकपणे त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी आल्याने काम करताना त्यांनाही काही अडचणी येत असल्याचे आणि जनाई-शिरसाई प्रश्नही त्याचाच एक भाग असल्याचे दिसते. हा प्रश्न सोडवण्यासाठी बारामती आणि पुरंदरमधील शेतकऱ्यांनी विरोधी पक्षात असलेले कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना हाक दिली. त्यावरून गेल्याच आठवड्यात त्यांनी कुकडीच्या बैठकीसोबतच या विषयावरही बारामती-पुरंदरमधील शेतकऱ्यांसह पुण्यात सिंचन भवनमध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली होती आणि या बैठकीत ठरल्याप्रमाणे दोन दिवसांपूर्वी जनाई-शिरसाईसाठी पाणी सोडण्याचा निर्णयही झाला होता. परंतु दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रशासनाने जनाई-शिरसाईतून पाणी न सोडल्याने आक्रमक झालेले आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी पुण्यात शेतकऱ्यांसह पुन्हा सिंचन भवन गाठून प्रशासनाला खिंडीत गाठले. अखेर त्यांच्या आक्रमकतेपुढे प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि पाण्याची हानी गृहीत धरुन कोणत्याही गावाला नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन पाणी वाढवून देण्याचे आश्वासन यावेळी प्रशासनाने दिले. आता आज गुरुवार (दि. २१ मे) संध्याकाळी किंवा उद्या (शक्रवार दि. २२) सकाळी ९ वाजता हे पाणी सोडण्यात येणार असून तसे लेखी आश्वासन त्यांना प्रशासनाकडून देण्यात आले. बारामतीसह दौंड, इंदापूर आणि पुरंदर या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांचा खडकवासला धरणाच्या पाण्यावर अधिकार आहे. येथील सर्वच नागरिक महत्त्वाचे असून त्यांना समान न्याय मिळणं ही आमची भूमिका आहे. परंतु असमतोल वाटपामुळं काही तालुक्यातील काही गावांवर अन्याय होतो. हा अन्याय होण्यामागील कारणांचा शोध घेतला असता त्यामागे खडकवासला कालवा कारणीभूत असल्याचे दिसते. या कालव्याची १ हजार क्यूसेक्सपर्यंत कमी झालेली वहन क्षमता आणि साफसफाई व देखभालदुरुस्ती करुन पूर्ववत १४०० क्यूसेक्स करण्याची गरज आहे. हा मुद्दा प्रशासनाकडे मांडला आणि त्यांनीही तो मान्य केला. पुढील आवर्तनापर्यंत हे काम पूर्ण करण्याचा शब्द प्रशासनाने दिला आहे. – रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड. हेही वाचा :