Rohit Pawar : …तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही; रोहित पवार भूमिकेवर ठाम
मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाहीत, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी घेतली.

Rohit Pawar : राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या कृषी कर्जमाफी योजनेत कठोर अटी आहेत. या अटींमुळे सुमारे ३७ लाखांहून अधिक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत.
यामुळे या अटी रद्द होत नाही आणि मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाहीत, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी घेतली.
शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीच्या मागणीचा आग्रह धरत रोहित पवार यांनी शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. यानंतर प्रशासकीय शिष्टमंडळ आणि रोहित पवार यांच्यामध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या चर्चांनंतरही तोडगा निघाला (Rohit Pawar) नसल्याचेही समोर आले आहे.
अशामध्ये शनिवारी (१३ जून) दुस-या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. यावेळी सकाळी डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांची तपासणीही केल्याचे समोर आले. अशामध्ये कृषिमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतरही ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
शुक्रवारी रात्री अनेकदा प्रशासकीय शिष्टमंडळाने दोन ते तीनवेळा रोहित पवारांची भेट घेतली. पंढरपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वत: मध्यस्थी करत आहेत. त्यांनी आंदोलनस्थळावरूनच रोहित पवार यांची थेट राज्याचे कृषिमंत्री आणि सहकार मंत्र्यांशी फोनवर चर्चा घडवून आणली.
राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी २०१९ च्या कर्जमाफीची जाचक अट मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे माध्यमांसमोर जाहीर करावे, तरच आम्ही हे अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याचा विचार करू, अशी भूमिका रोहित पवारांनी (Rohit Pawar) घेतली.
रोहित पवार म्हणाले, सरकारने काढलेल्या कर्जमाफीच्या परिपत्रकामध्ये २०१९ चा लाभ घेतलेल्या शेतक-यांना केवळ ५० हजारांपर्यंत लाभ देण्याची अट आणि प्रोत्साहन अनुदान देताना २०२५-२०२६ आणि २०२६-२०२७ चे पीक कर्ज भरणे अनिवार्य केल्याची अट आहे.
या दोनच अटींमुळे सुमारे ३७ लाखांहून अधिक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या दोन जाचक अटी आधी काढा, एवढीच आमची साधी सरळ मागणी आहे. तोपर्यंत अन्नत्याग आंदोलनातून (Rohit Pawar) माघार नाही,’ अशी भूमिका त्यांनी दुस-या दिवशी मांडली.






