मुंबई : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे हे नेहमी आपल्या विधानामुळे चर्चेत असतात. ते नेहमीच हिंदुत्त्वाचा पुरस्कार करताना दिसतात. कोकणात त्यांचे मोठे वर्चस्व आहे. आता त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांच्या बाबतीत एक खळबळजनक दावा केला आहे. रोहित पवार हे 2019 सालीच भाजपात येणार होते, असा दावा नितेश राणे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काय म्हणाले नितेश राणे? रोहित पवार हे 2019 सालीच भाजपात येणार होते. ते कुठल्या वेळी कोणत्या भाजपाच्या नेत्यांना भेटतात हे आम्ही बोलायला लागलो तर रोहित पवार यांना तोंड वाचवायला जागा राहणार नाही. रोहित पवार हे मनाने भाजपात आहेत. शरीराने शरद पवार यांच्या पक्षात आहेत, असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे. रोहित पवारांवर महत्वाची जबाबदारी रोहित पवार हे शरद पवार यांच्या पक्षातील तरुण आणि तडफदार नेते मानले जातात. भाजपा तसेच सत्ताधाऱ्यांवर त्यांनी वेळोवेळी टीकेचे आसूड ओढलेले आहेत. रोजगार, शिक्षण, शेती आदी क्षेत्रांतील प्रश्नांना घेऊन ते सरकारला घेरताना दिसतात. त्यांना नुकतेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. शशिकांत शिंदे यांची प्रदेशध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर रोहित पवार यांना ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदाची आणि पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेलच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली.त्यामुळे आता राणे यांच्या दाव्यावर रोहित पवार नेमकं काय उत्तर देणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.