Rohit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये विलिनीकरणाची चर्चा अजित पवार यांच्या निधनानंतर जोरात रंगली होती. अजित पवार गट एनडीए सोबत सत्तेत (Rohit Pawar) सहभागी असल्याने, शरद पवार गट देखील एनडीएत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षातील महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला पक्षातील सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. अनेक पदाधिकाऱ्यांनी दोन्ही राष्ट्रवादी गटांचे विलिनीकरण होणार आहे की नाही, याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी केली होती. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, पक्षाचे विलिनीकरण होणार नाही. या बैठकीला शरद पवार यांचीही उपस्थिती होती. मात्र त्यांनी या मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शरद पवार यांच्या समोरच सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी विलिनीकरण नाकारण्याची भूमिका जाहीर केली. दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत महत्त्वाचे विधान केले आहे. Rohit Pawar मुलाखतीत रोहित पवार (Rohit Pawar) यांना विचारण्यात आले की, “विलिनीकरणाची चर्चा आता थंड पडली असली तरी राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते सरकारविरोधात फार आक्रमक भूमिका घेताना दिसत नाहीत. तुम्ही एकटे सोडले तर इतर नेते सरकारवर तीव्र टीका करताना दिसत नाहीत. त्यामुळे लोकांना अजूनही वाटते की मागच्या दाराने चर्चा सुरू आहे. समजा विलिनीकरण होऊन राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीए सोबत गेला तर तुमची भूमिका काय असेल?” या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले, “जर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विलिनीकरण होऊन एनडीए सोबत गेला तर मी दुसरा पर्याय निवडेन. इतर पर्याय निवडेन, पण भाजपसोबत जाणार नाही.” रोहित पवारांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. यानंतर मुलाखतकाराने विचारले, “दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही काँग्रेससोबत जाणार का?” मात्र या प्रश्नावर रोहित पवार यांनी स्पष्ट उत्तर टाळले. ते म्हणाले, “मी बघेन, दुसरा पर्याय निवडेन, पण भाजपसोबत जाणार नाही.” रोहित पवार हे सध्या शरद पवार गटातील आक्रमक आणि सक्रिय युवा नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांचे हे विधान पक्षातील अंतर्गत मतभेद आणि भविष्यातील राजकीय रणनीतीबाबत नवे संकेत देत आहे.