मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महत्व कमी करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. त्यामध्ये अजित पवार यांच्याच पक्षातील राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल हे मदत करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. ज्या लोकांना अजित पवार यांनी सोबत नेले, तेच आता त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राज्याचा मुख्यमंत्री बनण्याची क्षमता अजितदादांकडे होती, पण ती आता कुठे दिसत नाही. कारण भाजपच त्यांची ताकद कमी करत आहे. त्यासाठी भाजपला राष्ट्रवादीतील एक विदर्भातील आणि एक कोकणातील नेता मदत करत आहे. आमच्याकडे एक परिवार होता. अजितदादांसोबत सगळे नेते होते. पण फक्त भाजपसोबत जाण्यासाठी या सगळ्यांना सोडले. आमच्या राष्ट्रवादीमध्ये सर्व आलबेल आहे. आमच्या पक्षात नेते कमी आणि कार्यकर्ते, पदाधिकारी जास्त आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळेल. आधीही आम्ही निवडणुकीतील मतचोरीचा मुद्दा मांडला होता तो आता, भाजपनेही मान्य केला आहे. आशिष शेलारांनी दुबार मतदान होत असल्याचे मान्य केले. तसेच निवडणूक आयोगानेही त्याला पुष्टी दिली आहे. त्यामुळे आमचा मुद्दा हा योग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका या स्थानिक नेत्यांची मते जाणून घेऊन लढल्या जातील. महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढायचे का की स्वतंत्र लढायचे हे सगळे एकत्र बसून ठरवू, अशी माहिती त्यांनी दिली.