शाळा सुरू करण्याबाबत रोहित पवार म्हणाले…

मुंबई – राज्य शासनाच्या आदेशानुसार 9 वी ते 12वीच्या पालिकेच्या तसेच खासगी शाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात पुढील दोन दिवसात वाढणाऱ्या नवीन करोनाबाधित रुग्णांचा अंदाज घेऊन शाळा सुरू ठेवायच्या की बंद करायच्या याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडून सोमवारपर्यंत घेतला जाण्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.

काय आहे रोहित पवार यांची पोस्ट : 

जवळपास आठ महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यात परवा इयत्ता ९ वी पासून पुढच्या वर्गातील शाळा सुरू होत आहेत. कोरोनाचं संकट अद्याप कायम असल्याने पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत अद्याप तरी कोणताही निर्णय झालेला नाही.

हळूहळू सर्वच शाळांचे आवार मुलांनी फुलावेत आणि वर्गातील तोच किलबिलाट पुन्हा ऐकायला मिळावा, मैदानांवर रंगलेले वेगवेगळ्या खेळांचे डाव दिसावेत यासाठी आपण सगळेच आसुसलो आहोत. याबाबत निर्णय सरकार योग्य वेळी घेईलच, पण तूर्तास आपण जिथं शाळा सुरू होतायेत त्यांचा विचार करू.

शाळा सुरू झाल्या म्हणजे सगळं काही पूर्ववत झालं असं नाही, तर उलट आपल्याला आणखी जबाबदारीने वागावं लागणार आहे. यामध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची राहणार आहे. सक्तीने मास्कचा वापर करणं, नियमित हात धुणं किंवा सॅनिटायझरचा वापर करणं, शारीरिक अंतर राखणं हे साधे-साधे नियम आतापर्यंत आपल्या सर्वांच्या पाठ झाले आहेत.

नियम साधे असले तरी कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हेही आपल्याला माहीत आहे. त्यामुळं याकडं दुर्लक्ष करुन बिलकूल चालणार नाही. प्रत्येकाने हे नियम पाळायचे आहेतच पण दुसऱ्यालाही त्यासाठी भाग पाडायचं आहे. तरच सध्या हळूहळू रुळावर येत असलेला गाडा पुढंही चालू राहील, किंबहुना वेग घेईल. कारण गेली काही महिने नाईलाजाने कराव्या लागलेल्या लॉक डाऊनचे भयंकर चटके आपण सहन केले आहेत.

लाखो-करोडो लोकांचा रोजगार गेल्याने या लोकांची कुटुंब आज मोठ्या अडचणीत आहेत आणि अशीच परिस्थिती आपल्याला पुन्हा आणायची नसेल तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. या जबाबदारीचं कोणतंही ओझं नाही तर फक्त प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यायचीय, एवढं हे सोप्पय आणि आपण ते कराल असा विश्वास आहे.

आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मुंबई-ठाण्यासह काही जिल्ह्यात शाळा सुरू करण्यास परवानगी मिळालेली नाही. त्यामुळं इथल्या विद्यार्थ्यांनी निराश होण्याचं कोणतंही कारण नाही. परिस्थितीनुसार योग्य वेळी इथंही शाळा सुरू होतील. तोपर्यंत शहरात बहुतेक ठिकाणी सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय आपल्याकडं उपलब्ध आहेच. आपण घरून अभ्यास करू शकतो. अवांतर वाचन करून वेळेचा सदुपयोग करू शकतो. त्यामुळं या विद्यार्थ्यांनी कोणतंही टेन्शन घेऊ नये, असेही रोहित पवार यांनी सांगितले आहे.

जवळपास आठ महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यात परवा इयत्ता ९ वी पासून पुढच्या वर्गातील शाळा…

Posted by Rohit Rajendra Pawar on Friday, November 20, 2020 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.