Rohit Pawar – जर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी भाजपविरोधात लढण्यास तयार असेल, तरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी केले. सिंचन भवन येथील बैठकीनंतर आमदार पवार यांनी माध्यमांशी संवाद साधून विविध मुद्द्यांवर स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. येत्या १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत वरिष्ठ नेत्यांच्या बैठका पार पडल्या. त्याबाबत बोलताना पवार म्हणाले, की बैठकीत संघटनात्मक बदल आणि वर्धापनदिनाच्या नियोजनावर चर्चा झाली असावी. सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली असली, तरी जोपर्यंत भाजपविरोधात लढण्याची भूमिका स्पष्ट होत नाही, तोपर्यंत कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी दूर होणार नाही. ते म्हणाले, की सध्या ग्रामीण भागात अनेक पंपांवर डिझेलचे रेशनिंग सुरू असून, शेतकऱ्यांना वणवण फिरावे लागत आहे. शेतकऱ्यांसाठी सकाळी ६ ते ९ ही वेळ शेतीच्या कामांची असते. मात्र, नेमक्या याच वेळी वीज खंडित केली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा प्रश्नाबाबत १८ मे रोजी नाशिकमध्ये मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पुण्यात कोयता गँगची दहशत वाढली असून, तरुण पिढी ड्रग्ज आणि दारूच्या आहारी जात आहे. साध्या हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सापडण्याच्या घटना घडत आहेत, हे राज्याच्या गृहविभागाचे अपयश आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. तुम्ही काय प्रयत्न केले? मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या टीकेबाबत पवार म्हणाले, की ज्या वेळी अजित पवार अडचणीत होते. त्या वेळी शेळके कधी बोलले नाहीत. सुनील तटकरे जेव्हा अडचणीत येतात, तेव्हा तुम्ही बोलता. विमान अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करून अजितदादांना न्याय देण्यासाठी, तसेच सीबीआयने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? तुम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी पाठविलेल्या स्मरणपत्राला भाजपने केराची टोपली दाखविली आणि आता चुरूचुरू बोलता, असेही पवार यांनी म्हटले.