Nasrapur Case : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका चार वर्षांच्या चिमुकलीवर एका 65 वर्षांच्या नराधमाने अत्याचार करून तिची निर्घूणपणे हत्या केली. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने महाराष्ट्र हादरला असून, आरोपीला फाशीची शिक्षा द्या, ही मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणी राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत असून, आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. या घटनेनंतर राजकीय नेत्यांकडून पीडित कुटुंबियांची भेट घेतली जात आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी नुकतीच पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. या प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे. या प्रकरणावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे की, 14 दिवसांमध्ये आम्ही हे प्रकरण निकाली काढू. आजची परिस्थिती पाहिली तर हा आकडा फक्त शब्दाचा नसावा, हीच अपेक्षा आहे. कारण चार्ज शीट दाखल करण्यासाठीच पंधरा दिवस लागणार आहेत. सरकारने या विषयात लक्ष घालून लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे.” राष्ट्रीय महिला आयोगाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, पोलिस प्रशासनाला महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, राज्याचे महिला आयोगाचे पद रिक्त असून, या पदासाठी रोहित पवारांनी काही नावे सुचवली आहेत. रोहित पवारांची राज्य सरकारकडे मोठी मागणी महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. त्या पदावर निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती करावी. नाहीतर निवृत्त आयएएस मेधा गाडगीळ यांची नियुक्ती करावी. तसेच, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे या स्त्री-भ्रूणहत्या संदर्भात काम करतात, नाहीतर मनीषा गुप्ते यांची नियुक्ती करावी, अशी मोठी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. पुढे रोहित पवार असेही म्हणाले की, “कोणाचीही नियुक्ती करा. पण, राजकीय व्यक्ती महिला आयोगावर बसायला नको, याची दक्षता सरकारने घ्यायला हवी. तसेच, शक्ती कायदा जो महाराष्ट्रातील अधिवेशनात पास करण्यात आला होता. पण, केंद्र सरकारने त्याला नकार दिला. तो शक्ती कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रात लागू केला पाहिजे,” अशी देखील विनंती त्यांनी केली आहे. आंदोलकांचे मुंबई-बंगळुरू महामार्गावर आंदोलन या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आणि पुण्यातील नवले पुलाजवळ मोठ्या प्रमाणावर आंदोलन एकवले होते. रुग्णावाहिका रस्त्यात आणून त्यामध्ये निष्पाप चिमुकलीचा मृतदेह ठेवण्यात आला होता. जो पर्यंत नराधमाला फाशी दिली जाणार तो पर्यंत मागे हटणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेण्यात आला होता. मात्र, काही वेळानंतर पोलिसांनी बळाचा वापर केल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. त्यानंतर काल रात्री उशिरा निष्पाप चिमुकलीवर अत्यंसंस्कार करण्यात आले. फडणवीसांची प्रतिक्रिया आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पीडितेच्या वडिलांशी फोनद्वारे संवाद साधला. याबाबतची माहिती देताना ते म्हणाले “मी काल स्वत: पिडीतेच्या वडिलांशी दोनवेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं, आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करुन घ्यायची आहे. त्यासाठी वेळेत चार्जशीट दाखल होणे आणि केस चालणे, माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेत आहोत.” फडणवीसांनी दिले आश्वासन आरोपीच्या फाशीच्या शिक्षेच्या मागणीवर बोलताना फडणवीसांनी लोकशाहीत आपल्या सगळ्यांना वाटतं, अशा नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे. पण ते लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते. पण कोणालाही कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये, यादृष्टीने कोणताही कोणतीही पळवाट न ठेवता या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, याचा प्रयत्न राज्य सरकार करेल, अशे आश्वासन दिले. हेही वाचा : Sudesh Kumar Passes Away : अनेक हिट फिल्म्स देणारा दिग्गज अभिनेता काळाचा पडद्याआड! मुंबईत घेतला अखेरचा श्वास