Rohit Pawar – राष्ट्रवादीचे (शप) आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेत, दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीबाबत चर्चा केली आहे. हा मुद्दा संसदेच्या अधिवेशनात उचलून धरण्याची त्यांनी विनंती केली आहे. त्यांनी अपघाताच्या चौकशीसाठी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांचीही भेट घेतली आहे. या अपघातामागे राजकीय षडयंत्र असण्याची शक्यता असून, तपास जाणीवपूर्वक संथ गतीने चालवला जात असल्याचा रोहित पवार यांनी आरोप केला आहे. रोहित पवार म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीला एफआयआर नोंदवण्याचा अधिकार आहे, मात्र अजित पवारांच्या अपघाताबाबत तसे करण्यास का अडथळे येत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, हा विषय सीबीआयकडे सोपवण्याचा प्रस्ताव अद्याप का स्वीकारला गेला नाही, यावरही त्यांनी बोट ठेवले. व्ही.के. सिंग आणि व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यामुळे या अपघातामागील राजकीय षडयंत्राचा संशय अधिक वाढत चालला आहे. जरी अजित पवारांचे कुटुंबीय सध्या सरकारमध्ये असले, तरी एक मराठी माणूस म्हणून अन्यायाविरुद्ध लढणे हे त्यांचे कर्तव्य असल्याचे म्हटले. राहुल गांधी यांच्या संशोधन टीमनेही या विषयावर प्राथमिक अभ्यास केला असून, रोहित पवारांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली अधिकची माहिती त्यांना सुपूर्द केली आहे. विमान वाहतूक मंत्रालय आणि सीबीआय हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने हा मुद्दा लोकसभेत आणि राज्यसभेत येणे अत्यंत गरजेचे आहे. राज्याच्या अधिवेशनातही हे प्रश्न उपस्थित केले होते, मात्र त्यावर चर्चा टाळली जात असल्याचे त्यांनी सांगितले.