भाजपने संधी दिल्यास सोनं करणार; उज्ज्वल निकमांच्या पुतण्याने विधानसभेसाठी ठोकला शड्डू

जळगाव : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. यामध्ये आता सरकारी वकील उज्ज्वल निकमांच्या पुतण्याची भर पडली आहे. पक्षाने संधी दिली तर आपण संधीचं सोनं करू असं सांगत विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचे पुतणे आणि भाजपचे कार्यकर्ते रोहित निकम यांनी जळगाव शहरातून इच्छुक असल्याचं जाहीर केलं. जळगावात ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्याच्याबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चाना उधाण आले आहे.
जळगाव शहरातून भाजपकडून गेल्या दोन टर्मपासून सुरेश भोळे हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळीही तिसऱ्यांदा उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. जळगाव शहरातून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामध्ये आता विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांची भर पडल्याने भाजपला निर्णय घेणे अवघड जाणार आहे.
पक्षाचा आदेश पाळणार
लोकसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक उमेदवार होतो. मात्र पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली नसली तरी आपण नाराज न होता पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे काम केलं. यावेळीही पक्ष जो आदेश देईल त्याचं आपण पालन करणार आहोत. पक्षाच्या धोरणाच्या बाहेर जाऊन आपण कोणतेही काम करणार नाही असेदेखील रोहित निकम म्हणाले आहेत.





