Nevasa : जबरी चोरीचा उलगडा; नेवासे पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या
Nevasa : सदर गुन्हा सुभाष दिलीप शिंदे रा. बहिरवाडी ता. नेवासे जि. अहिल्यानगर व त्याचे सोबत असलेल्या साथीदाराने केला असल्याची गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी या गुन्ह्यात सदरील आरोपी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.

नेवासे : गोधेगाव (ता. नेवासे) येथील जबरी चोरी प्रकरणाचा नेवासे पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून या गुन्ह्यातील तिघा आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नेवासे पोलीस सूत्रांनी दिलेल्या या गुन्ह्याची हकीकत अशी की, दि.१७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २२.४० वाजेच्या सुमारास फिर्यादी व साक्षीदार हे घरात झोपलेले असताना तीन अनोळखी इसमांनी फिर्यादीस आवाज देऊन घराचा दरवाजा उघडायला लावला. त्यानंतर फिर्यादीस खाली पाडून फिर्यादीचे डोक्यावर कोणत्या तरी टणक हत्याराने मारहाण केली.
तसेच फिर्यादीची बहिणीची मुलगी साक्षीदार हिचे गळ्याला चाकू लावून फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडील ५९ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने व मोबाईल हे बळजबरीने चोरून नेले होते. याबाबत फिर्यादीच्या तक्रारीवरून नेवासे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा सुभाष दिलीप शिंदे रा. बहिरवाडी ता. नेवासे जि. अहिल्यानगर व त्याचे सोबत असलेल्या साथीदाराने केला असल्याची गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी या गुन्ह्यात सदरील आरोपी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील,पो. कॉ. सुमित करंजकर, नारायण डमाळे, अतुल शेळके, परमेश्वर गहाळ, सुनिल गंगावणे, गणेश जाधव यांना तपास कामी आदेश दिले असता सुभाष दिलीप शिंदे हा मिळून आल्याने त्याच्याकडे विचारपूस केली. त्याने सदरचा गुन्हा अभिषेक दत्तात्रय मोटे, पोपट बाबासाहेब गाडेकर रा. गोधेगाव ता. नेवासे यांच्यासह केला असल्याची कबुली दिली.
त्यानुसार आरोपी नामे सुभाष दिलीप शिंदे रा.बहिरवाडी ता.नेवासे,अभिषेक दत्तात्रय मोटे रा.गोधेगाव ता.नेवासे, पोपट बाबासाहेब गाडेकर रा.गोधेगाव ता.नेवासे यांना अटक करण्यात आली त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
तांत्रिक पुराव्याशिवाय तपास
सदर गुन्ह्यात कसल्याही प्रकारचा तांत्रिक पुरावा नसताना केवळ गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला असून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पो.कॉ.सुमित करंजकर, नारायण डमाळे, अतुल शेळके, परमेश्वर गहाळ, सुनिल गंगावणे, श्रीरामपूर सायबर सेलचे संतोष दरेकर, सचिन धनाड यांनी केली आहे. या कारवाईमुळे गोधेगाव परिसरातील नागरिकांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला.





