पुणे – एटीएम कार्डची चोरी करून पैसे लंपास करणाऱ्या तरुणाचा मुंबईत तीन दिवस माग काढून अलंकार पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दिवाकर राघव मेहता (वय 25, रा जयपूर, राजस्थान) असे तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी अश्विन पंडित यांनी तक्रार दिली होती. त्यांनी “काऊच सर्फिंग’ या वेबसाईटवर आपल्या घरी पेईंग गेस्ट ठेवण्याविषयीची माहिती दिली होती. त्यानुसार चोरट्याने त्यांच्याकडील रूम भाड्याने घेतली होती. दिवाकर मेहता हा पंडित यांच्याकडे यापूर्वी काही दिवस राहिला होता. त्यानंतर तो काही दिवसांपूर्वी पुन्हा आला. पंडित यांची आई आजारी असून त्या गादीवरून उठू शकत नाही.
पंडित हे दोन दिवस बाहेर गेले होते. त्यांच्या आईचे एटीएम कार्ड त्यांच्या खोलीत होते. मेहता याच्या ते लक्षात आले. त्याने कार्ड व पाकिट घेऊन त्याद्वारे एटीएममधून 90 हजार रुपये काढले. त्यानंतर बॅंकेतून पैसे काढल्याचा मेसेज आला पण तो आईच्या मोबाइलवर आल्याने तो कोणी पाहिला नाही. यानंतर मेहताने घरातून पोबारा केला. जेव्हा पंडित घरी आले तेव्हा त्यांनी आईचा मोबाइल पाहिला तेव्हा पैसे काढलेला मेसेज त्यांनी पाहिला. त्यानुसार त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली.