घोरदरी येथील शेत आखड्यावर दरोडा! बंदुकीचा धाक दाखवत सात लाखांचा ऐवज लंपास, घटनेने परिसरात खळबळ

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील घोरधडी येथील शेत शिवारातील एका आखाड्यावर चार चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री बारा वाजल्याच्या सुमारास बंदुकीचा व चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकला आहे. दागिने व रोख रक्कम अंदाजे सात लाख रुपये घेऊन चोरट्यांनी पळ काढला. आवाज कराल तर मारून टाकू अशी धमकी देऊन सर्वांना एका खोलीत कोंडून ठेवले होते.
सेनगाव तालुक्यातील घोरदडी येथे गुरुवारी मध्यरात्री बारा वाजता अशोक माणिक साबळे यांच्या आखाड्यावर चार दरोडेखोरांनी दरोडा टाकला. सर्वांनी काळा रुमाल तोंडाला बांधलेला होता आणि मध्ये रात्री बारा वाजण्याच्या सुमारास यांच्या आखाड्यावर आले व चाकूचा व बंधूकीचा धाक दाखवला. त्यामुळे भयभयीत झालेल्या घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने काढून चोरट्यांना दिले. सुशिला माणिक साबळे व रुक्मिना आसाराम साबळे यांच्या अंगारा अंगावरील हातातील कडे गळ्यातील मंगळसूत्र गळ्यातील पोत असे सर्व दागिने काढून नेले. सर्व रोख रक्कम दागिन्याचंसह सात लाख रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
अशोक साबळे चोरांच्या व त्यांच्या झटापटीत झाले जखमी
अशोक साबळे यांनी या चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरांनी त्यांच्या हातावर चाकूने वार केला व तुमच्या घरातील सर्व दागिने पैसे आम्हाला द्या, अन्यथा तुम्हाला मारून टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर सर्वांना घरातील एका खोलीत कोंडून ठेवले. सर्वांचे मोबाईल घेऊन आजूबाजूला फेकून दिले. त्यानंतर घराला बाहेरून कडी लावून घेतली. सकाळी चार वाजण्याच्या सुमारास सर्वजण बाहेर आले आणि गावातील ग्रामस्थांनाच चोरीची आणि त्यांच्यासोबत काय घडलं याची हकीकत सांगितली.
दरम्यान, माणिक साबळे यांनी सेनेगाव पोलीस ठाणे गाठत घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सेनगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक मस्के, शिवसांब घेवारे, जमादार सुभाष चव्हाण, टी. के. वंजारे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर श्वान पथकाला पाचारण केले. तसेच ठसे तज्ञ देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. श्वान पथकाला चोरट्यांचा माग काढता आला नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये जखमी झालेल्या अशोक साबळे यांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चार पथकांकडून सदरील घटनेचा तपास सुरू
या प्रकरणात पोलिसांनी तातडीने चार पथके स्थापन करून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न चालू केले असून काही संशयीतांची चौकशी केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. तर घटनेच्या वेळीच विज पुरवठा कसा खंडीत झाला याची माहिती घेतली जात असल्याचे सुत्रांनी सांगितले.





