satara | महाबळेश्वर येथील रस्ते चमकले पण सुरक्षिततेचा काय ?

महाबळेश्वर, {संदेश भिसे} – गेल्या काही दिवसातच स्थानिक व पर्यटकांसाठी मुख्य दळण-वळणासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे असे पाचगणी- महाबळेश्वर रस्ता, प्रतापगड, तापोळा, मेढा, क्षेत्र महाबळेश्वर रस्ता असे मुख्य रस्ते नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहेत.
परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा रिफ्लेक्टर तर संरक्षक कठड्यांची अजून पर्यंत काम झालेलीच नाहीत. त्यामुळे महाबळेश्वर येथील रस्ते चमकले पण सुरक्षिततेचा काय ? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
सध्या पावसाळी हंगाम सुरू झाला असल्याने महाबळेश्वरमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असते. याच बरोबर दिवस, रात्र धुक्याचे ही साम्राज्य मोठ्या प्रमाणावरती पसरते. अशा परिस्थितीत रात्रीच नाहीतर दिवसाच्या वेळेस ही वाहन चालवताना वाहनचालकांना तारे वरची कसरत करावी लागत आहे.
रात्रीच्या वेळेस गाडी चालवताना धुक्यामध्ये रस्ता वळणे कुठे आहेत हेच वाहन चालकांना सहजा सहजी लक्षात येत नाही. पर्यटकांबरोबर रोजचा जाण्या येण्याचा रस्ता असूनही स्थानिकांची सुद्धा वाहन चालवताना तारांबळ उडत असते.
बऱ्याचदा बाहेरून आलेल्या पर्यटकाना धुक्यामध्ये नीट रस्त्याचा अंदाज न आल्याने या आधी सुद्धा अपघात झाले असल्याच्या घटना घडल्या आहेत. पाचगणी, तापोळा रस्ता येथे देखील बऱ्याच मोऱ्याना कठडे नाहीत तर प्रतापगड रस्त्यावर देखील बऱ्याचदा छोट्या मोठ्या दरडी पावसामध्ये कोसळत असतात. यातच धुक्याचे प्रमाण देखील या रस्त्यावरती जास्त असते.
जीवीतहानी झाल्यावरच जाग येणार का?
मुख्यतः पावसाळी हंगामाच्या आधीच रस्त्यांची कामे करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूस लाईट रिफ्लेक्टर्स लावणे तसचे कठड्यांची दुरुस्ती कामे होणे अपेक्षित होते.
परंतु पावसाळा सुरू झाला असून देखील याकडे संबंधित खात्याचे अजिबात लक्ष दिले नाही. संबंधित खाते तसेच अर्धवट काम करणारे ठेकेदार यांना एखादी जीवीतहानी झाल्यावरच जाग येणार का? असा सवाल आता स्थानिकांमधून विचारला जात आहे.
रस्त्याच्या दुतर्फा लाईट रिफ्लेक्टर लावा
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असून मोठ्या प्रमाणावरील महाबळेश्वर ला वर्दळ असते असे असून देखील संबधित खात्याचा कारभार बेजबाबदार प्रवृत्ती चा असल्याचे निदर्शनास येत असून लोकांचे जीवाशी खेळण्याचं काम संबंधित खात्याकडून होत आहे
तरी लवकरात लवकर रस्त्याच्या दुतर्फा लाईट रिफ्लेक्टर लावण्यात यावेत अशी मागणी महाबळेश्वर वासियांकडून होत आहे.





