पुणे जिल्हा | इंदापुरात रस्ते, बाजारपेठेत शुकशुकाट

इंदापूर, (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यात गावोगावी सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाच्या तीव्रतेने रस्ते, महामार्ग, बाजारपेठा ओस पडल्या आहेत. तर कलिंगड, शितपेयाची मागणी वाढली आहे. तर विक्रीसाठी बसलेले दुकानदार छत्रीचा आधार घेत आहेत.
इंदापूर तालुक्यात पहिल्यांदाच उन्हाळ्यातील सर्वात कडक तापमानाला सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिल आणि मे महिन्यात तापमानाची चढउतार, अवकाळी यामुळे उन्हाची तीव्रता अपेक्षेएवढी जाणवली नाही. मात्र, गेल्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली.
शनिवारी 42.अंश सेल्सिअस तापमान ग्रामीण भागात गेले होते. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. सकाळच्या वेळी हलकीशी थंडीची झुळूक असते. मात्र, सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते. रणरणत्या उन्हामुळे सायंकाळपर्यंत जीव हैराण होऊन जात असल्याने शेतीच्या कामासह सर्वजण थंडावा येईपर्यंत विश्रांती घेताना दिसतात.
शेतावर मशागतीसाठी गेलेला बळीराजा झाडांच्या सावलीच विसावा घेतो, तर मेंढपाळही आपल्या मेंढरांना मोठ्या झाडाखाली थांबवत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून सूर्यनारायणाने रौद्ररूप धारण केल्याने तालुका परिसरात उष्णतेची लाट पसरली असून यामध्ये मजूर कष्टकरी नागरिक होरपळून निघाले आहेत.
गरज असेल तरच घराबाहेर
डोळ्यांवर गॉगलचा वापर करा, थंड ताक, सोलकढी, उसाचा रस, फळे आदींचे सेवन करा, डोक्यावर टोपी, सनकोटचा वापर करावा, थंड आणि स्वच्छ भरपूर पाण्याचा वापर करा, उन्हाचा कडाका वाढताच पाणी पिणे आरोग्यदायक असते असे डॉक्टरांनी नमूद केले.





