Road Safety – पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयासमोरील सिमेंट ब्लॉकचा रस्ता गेल्या महिनाभरापासून पूर्णपणे उखडून गेला असून संपूर्ण परिसरातील रस्ते खराब अवस्थेत आहे. हा चौक पिंपळे गुरवमधील प्रमुख वर्दळीचा भाग असून येथे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. तसेच परिसरात अनेक लहान-मोठी दुकाने असल्याने नागरिकांचीही सतत गर्दी असते. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी विविध कामांसाठी खोदकाम करण्यात येते. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत न केल्याने सिमेंट ब्लॉक उखडले जात आहेत. रामकृष्ण मंगल कार्यालयासमोरील मुख्य गोलाकार भागात मोठ्या प्रमाणात ब्लॉक निखळून खडी व माती पसरली आहे. त्यामुळे रस्ता घसरडा बनला असून दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी अनेक वेळा दुचाकी वाहने घसरून किरकोळ अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थापत्य विभाग व महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. “ब्लॉक उखडून गेल्याने मोठ्या प्रमाणात माती व खडी रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. महानगरपालिकेने त्वरित दुरुस्ती करून संभाव्य हानी टाळावी,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन द. सोनवणे यांनी केली आहे.