पुणे – पुणे शहरातील खड्ड्यांच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. पावसामुळे बहुतांश रस्त्यांची चाळण झाली होती. परिणामी, वाहनचालकांचे हाल होत होते. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरातील पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली आहे. पुढील 4-5 दिवसांत सर्व खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. या कामास सोमवारपासून (दि. 26) सुरवात झाली आहे. प्राधान्यक्रम ठरवून जेथे रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. तसेच, रेती बाहेर येऊन दुचाकी घसरण्याचा धोका संभवतो, अशा धोकादायक ठिकाणांची कामे आधी हाती घेतल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, “पुणंच गेलंय खड्ड्यात’ या आशयाचे वृत्त दै. “प्रभात’च्या दि. 17 ऑक्टोबर रोजीच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून रस्ते दुरुस्तीच्या कामांना सुरवात झाल्याचे दिसते. 19 ऑक्टोबरपासून खड्डे दुरुस्ती सुरू होणार होती. मात्र, डेडलाइन उलटून 7 दिवसांचा कालावधी लोटल्यावर अखेर 26 ऑक्टोबरपासून रस्ते दुरुस्तीला मुहूर्त मिळाला.