Pimpri : जाधववाडी येथील रस्ता की डबके?

चिखली : पिंपरी-चिंचवड परिसरातील श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या कैलास सरोवर महादेव मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या खड्ड्यांनी भरलेला आहे. सततच्या पावसामुळे हा रस्ता डबक्यांमध्येच परिवर्तित झाला आहे. विशेष म्हणजे श्रावण महिना सुरू झाल्यामुळे मंदिरात भक्तांची, मोठी गर्दी असते. त्यातही महिला भाविकांची मोठी संख्या आहे. मात्र, खड्ड्यांतून वाट काढताना त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
जाधववाडीतील हे तीन मजली भव्य मंदिर परिसरातील एकमेव मोठे शंकर मंदिर असून, येथे एकाच ठिकाणी ११११ शिवलिंगे आणि १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची सुविधा आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नागरिक येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. परंतु रस्त्याची दयनीय अवस्था आणि पावसामुळे साचलेले पाणी यामुळे या धार्मिक स्थळाकडे जाणेच एक आव्हान ठरले आहे.
विशेषतः महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे धोकादायक ठरत आहे. रस्त्यावरील खड्डे आणि त्यात साचलेले पाणी यामुळे अपघाताची शक्यता देखील वाढली आहे. रस्ता, पाणी आणि वीज या मूलभूत गरजांसाठी नागरिकांना अद्याप संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे.
जाधववाडी परिसरात झपाट्याने नागरीकरण होत असले तरीही महापालिकेचे दुर्लक्ष जाणवते. या भागात त्वरित रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा सण-उत्सवांमध्ये नागरिकांना होणारा त्रास अधिकच वाढणार आहे, हे निश्चित!
नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना किती समस्याना सामोरे जावे लागणे म्हणजे आमचे दुर्भाग्यच आहे. आम्हीही पालिका हद्दीतच राहतो असेही सांगावे लागते. याच कारणांमुळे स्वच्छ सर्वेक्षणमध्ये महापालिका पहिल्याहून सातव्या क्रमांकावर गेली आहे.
– प्रदीप आहेर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
रामायण मैदान पावसामुळे चिखलयुक्त झाल्याने शिवभक्त डांबरी रस्त्याने जातात. पण त्यावरही खड्ड्यामुळे चालणे अशक्य होत आहे. येथील खड्डे त्वरीत बुजविले जावेत, अशी मागणी महापलिका आयुक्ताकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
– विशाल आहेर, सामाजिक कार्यकर्ते
पाऊस सुरू असताना खड्डे बुजविता येत नाही. आता पाऊस उघडला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत खड्डे बुजविले जातील.
– नरेश जाधव, स्थापत्य विभाग, क प्रभाग





