जांबुत – शिरूर तालुक्यातील फाकटे-जांबुत या डांबरी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या मार्गावरून प्रवास करणे ग्रामस्थ, विद्यार्थी आणि वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. जड वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण झाली असून, प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. फाकटे-जांबुत या महत्त्वाच्या रस्त्यावर अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. हे खड्डे अपघातांना निमंत्रण देत असून, यामुळे अनेक किरकोळ आणि गंभीर अपघात घडले आहेत. रस्ता निकृष्ट दर्जाचा असतानाही या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत आहे. शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ याच रस्त्याचा दररोज वापर करत असल्याने त्यांचा प्रवास धोकादायक बनला आहे.या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. प्रत्येक वेळी अधिकारी खड्डे दुरुस्त करण्याचे केवळ आश्वासन देतात. खड्डे दुरुस्त करून देऊ असे सांगितले जाते, परंतु प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती केली जात नाही. अधिकारी ग्रामस्थांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जड वाहतुकीमुळे रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. विद्यार्थ्यांपासून ते ग्रामस्थांपर्यंत सर्वांनाच याचा त्रास होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी केवळ आश्वासने देत आहे, पण काम करत नाही. प्रशासनाने या समस्येकडे तात्काळ आणि गांभीर्याने लक्ष द्यावे आणि काम सुरू करावे. अन्यथा, रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा फाकटे गावचे सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे आणि ग्रामस्थ यांनी दिला आहे. हेही वाचा: “सभागृहात प्रश्न विचारणं, मुद्दा लावून धरणं म्हणजे ड्रामा नाही” ; प्रियांका गांधींचा पंतप्रधानांवर पलटवार