पुणे – मागील वर्षी भर पावसाळ्यातही महापालिकेकडून रस्ते खोदाई सुरूच ठेवल्याने शहरात वाहतूक कोंडीसोबतच पुणेकरांना खड्ड्यांचा सामना करावा लागला होता. त्यावरून महापालिकेच्या कारभाराचे पुणेकरांनी धिंडवडे काढले. त्यामुळे यंदा प्रशासन खडबडून जागे झाले असून, यावर्षी 30 एप्रिलपर्यंतच खासगी कंपन्या तसेच पाणीपुरवठा, महावितरण आणि एनएनजीएल कंपनीला खोदाईसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी शहरातील पावसाळ्यातील कामांबाबत घेतलेल्या आढावा बैठकीतही याबाबत निर्णय घेण्यात आला असून, सर्व संबंधित विभागांना तो कळविण्यात आल्याचे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. महापालिकेकडून शहरात दरवर्षी 30 एप्रिलपर्यंत खोदाईस परवानगी दिली जाते. त्यानंतर पुढील महिनाभर म्हणजेच 31 मेपर्यंत हे खोदाई केलेले रस्ते दुरुस्त केले जातात. त्यामुळे पावसाळ्यात अडचणी येत नाहीत मात्र, मागील वर्षी प्रशासनाने आपलेच नियम धाब्यावर बसविले. करोनामुळे अत्यावश्यक कामे झाली नसल्याचे सांगत महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि समान पाणी योजनेच्या कामाला या निर्णयातून वगळण्यात आले. परिणामी ऐन पावसाळ्यात शहरात मध्यवर्ती पेठांसह, उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते खोदाई करून तसेच ठेवण्यात आले. तर अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्ती अतिशय निकृष्ट स्वरूपाची करण्यात आली. परिणामी, शहरात पावसाला सुरुवात होताच अनेक ठिकाणी रस्ते खचले तसेच अनेक ठिकाणी नव्याने केलेले रस्ते उखडले. परिणामी, या रस्त्यांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. तसेच खराब रस्त्यांमुळे नागरिकांनाही पाठीच्या आजारांचा सामना करावा लागला. खोदाईतून 254 कोटींचा महसूल दरम्यान, महापालिकेस या वर्षात रस्ते खोदाईतून आतापर्यंत सुमारे 254 कोटींचा महसूल मिळाला आहे. तर पालिकेने 30 एप्रिलपर्यंत दिलेल्या परवानग्या पाहता आणखी 100 कोटींचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. खासगी मोबाइल कंपन्यांसाठी सुमारे 12 हजार रुपये, एचडीडीसाठी सुमारे सहा हजार तर शासकीय कंपन्यांना खोदाईसाठी साडेचार हजार रूपये प्रती मीटर शुल्क आहे. या कंपन्यांना दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर 1 ऑक्टोबरपासून पुढे आठ महिने खोदाईसाठी परवानगी दिली जाते. जी 20 परिषदही पुणेकरांच्या मदतीला दरम्यान, जून महिन्यात शहरात पुन्हा “जी-20′ परिषद होणार आहे. त्यामुळे महापालिकेस त्यापूर्वी पुन्हा शहरातील सर्व रस्ते चकाचक ठेवयाचे आहेत. तसेच खराब रस्त्यांची दुरुस्ती करायची आहे. त्यामुळे पथ विभागाने सरससकट 30 एप्रिलला रस्ते खोदाई बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. “जी-20′ परिषदेपूर्वी रस्ते चांगले करायचे झाल्यास त्यासाठी महिनाभराचा कालावधी लागेल. त्यामुळे नियोजित तारखेलाच सर्व खोदाई बंद केल्यास पुढील कामे करता येणार आहेत.