भाजपला मोठा धक्का, ‘या’ पक्षाने ठोकला एनडीएला रामराम

पाटणा- माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे (रालोजप) अध्यक्ष पशुपतिकुमार पारस भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडले. बिहारमधील विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच ती घडामोड घडली. पारस हे केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचे चुलते आहेत.
माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांनी स्थापन केलेल्या लोक जनशक्ती पक्षात (लोजप) फूट पडली. पासवान यांचे बंधू पारस आणि पुत्र चिराग या काका-पुतण्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याने ते घडले. त्यानंतर पारस आणि चिराग यांच्या नेतृत्वाखाली लोजपचे स्वतंत्र गट उदयास आले.
लोजपमधील फुटीनंतर चिराग वगळता इतर खासदार पारस यांच्या गटाचा म्हणजे रालोजपचे भाग बनले. तो गट एनडीएचा घटक असल्याने पारस यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले.
मात्र, मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीवेळी चित्र बदलले. बिहारमधील सत्तारूढ एनडीएने पारस गटाऐवजी चिराग गटाशी हातमिळवणी केली. त्यानंतरही पारस एनडीएमध्ये कायम राहिले होते. मात्र, त्यांची नाराजी दडलेली नव्हती. त्यामुळे ते एनडीएतून बाहेर पडतील असे मानले जात होते. अखेर अपेक्षेप्रमाणे पारस यांनी एनडीएची साथ सोडण्याची घोषणा केली.





