मुज्जफरपुर – बिहार मध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या एका नेत्याच्या नोकराला बंदुकीच्या धाकाने धमकाऊन त्याच्याजवळील 26 लाख रूपयांची रोकड लुटण्यात आल्याचा प्रकार आज घडला. मुसाफीर पासवान असे या राजद नेत्याचे नाव असून ते पक्षाचे माजी आमदार आहेत. त्यांच्याकडे व्यवस्थापक म्हणून काम करणारा त्यांचा मुकेश नावाचा नोकर ही रोकड घेऊन मोतीहारी गावाकडे दुचाकीवरून चालला असता त्याची गाडी सहवाजपुर राघोपुर चौकात सहा जणांनी अडवली. आणि त्याला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडील ही रोकड पळवून नेण्यात आली. लुटारूही मोटारसायकलवरूनच आले होते. मुकेश कडील दोन बॅगांमध्ये ही रोकड होती, त्या दोन्ही बॅगा त्यांनी पळवून नेल्या. मोतीहारी येथे सुरू असलेल्या कामाच्या मजुरांच्या पगाराचे हे पैसे होते असे राजद नेते पासवान यांचे म्हणणे आहे.