आरएसएस सर्टिफाइड मुख्यमंत्री ‘चिटीश कुमार’, विरोधी पक्षाने बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ फोटो शेअर करत साधला निशाणा

Nitish Kumar | वक्फ सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे. एनडीएचे घटक पक्ष असलेल्या जनता दल (युनायटेड) आणि टीडीपीच्या खासदारांनी देखील या विधेयकाच्या बाजूने मतदान केले. जनता दल (युनायटेड) या विधेयकाबाबत नक्की काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, पक्षाने विधेयकाला पाठिंबा दिला. मात्र, यावरून बिहारमधील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जेडीयूवर निशाणा साधला आहे.
आरजेडीने नितीश कुमार यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेशातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या फोटोशॉप केलेल्या फोटोमध्ये नितीश कुमार यांना पांढरा शर्ट आणि खाकी पँटमध्ये दाखवण्यात आले आहे. फोटोसोबतच त्यांचा उल्लेख ‘चिटीश कुमार’ करण्यात आला आहे.
‘आरएसएस सर्टिफाइड मुख्यमंत्री चिटीश कुमार’, अशा कॅप्शनसह आरजेडीने सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तसेच, एकीकडे जेडीयूने वक्फ विधेयकाला पाठिंबा दिला असला तरीही यावरून पक्षांतर्गत नाराजी पाहायला मिळत आहे. अनेक मुस्लिम नेते पक्षाची सोथ सोडत आहेत. मोहम्मद कासीम अन्सारी, मोहम्मद शहनवाझ मलिक आणि मोहम्मद तबरेझ सिद्दीकी या नेत्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
यावर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. बिहारमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. त्यातच आता जेडीयूने वक्फ विधेयकाला पाठिंबा दिल्याने विधानसभा निवडणुकीत याचा काय परिणाम होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





