Pimpri : नद्यांचे पाणी दूषित, जलचरांचा जीव धोक्यात

पिंपरी : नद्याचे पाणी खराब करणाऱ्यांवर कडक कारवाई होत नसल्याने केमिकलयुक्त व सांडपाणी प्रक्रिया न करता नद्यात सोडले जात आहे. यावर महापालिका आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ ठोस कारवाई करत नाही. नदीतील ऑक्सिजन पातळी कमी होवू लागल्याने जलचर प्राण्याना देखील ऑक्सिजन घेण्यासाठी पाण्याबाहेर तोंड काढावे लागत आहे. अनेकदा खराब पाण्यामुळे मृत माशांचा खच पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. त्यामुळे नद्याचे प्रदूषण कधी कमी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील पवना नदीतील पाणी शहरातील सुमारे ३० लाख नागरिक पित आहेत. त्याच पिण्याच्या पाण्यात काही कंपन्या, सोसायट्या, लॉड्री व्यवसायिक हे मैलामिश्रित, रसायन व केमिकलयुक्त, नाल्याचे सांडपाणी मिसळत आहे. त्यामुळे नद्यांमधील ऑक्सिजन पातळी कमी होवून जलचर प्राणी देखील मृत पावत आहेत.
पवना नदीचा उगम स्थानापासून रावेत बंधार्यापर्यंत नदीत मैलामिश्रित सांडपाणी, रसायन, निर्माल्य, घन कचरा, मांस, चिकन, फिश वेस्ट आदी बरेच काही जसेच्या तसे नदीत सोडून दिले जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाणी नमुन्याचे परीक्षण केल्यानंतर पाण्यातील प्राणवायूचे (डीओ) प्रमाण कमी होत असल्याचे आढळले आहे. तुलनात्मकदृष्ट्या रासायनिक (सीओडी) आणि जैविक प्राणवायूचे (बीओडी) प्रमाण दुपटीने वाढले आहे. त्यामुळेच पाणी प्रदूषणात लक्षणीय वाढ होत आहे.
पवना नदीला मिळणाऱ्या सदुंबरे, कासारसाई, सांगवडे, किवळे, मामुर्डी आदी ठिकाणी सांडपाणी थेट नदीत मिसळले जात आहे. भारताच्या निश्चित मानांकाच्या तुलनेत संबंधित नदीच्या पाण्यात रासायनिक घटक, केमिलयुक्त पाणी आणि जैविक प्राणवायूच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाल्याचे आढळले आहे. परिणामी, पवनेच्या पाणी प्रदूषणातही वाढ झाली आहे. पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूसाठी (डीओ) प्रमाण कमी झाल्याने जलचर प्राणी, मासे मरुन पडू लागले आहेत. रसायनयुक्त (सीओडी) वाढल्याने जलपर्णीचे प्रमाण वाढत चालले आहे.
नद्या फेसाळल्या तरीही ठोस कारवाई नाही.
पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणार्या पवना, इंद्रायणी नद्याचे पाणी दिवसेंदिवस खराब होत आहे. पवना आणि इंद्रायणी नद्या वारंवार फेसाळत आहेत. पवना नदीत पाण्यावर सतत फेस तरंगत असतो. तर इंद्रायणी नदीच्या पाण्यावर वारंवार पाण्यावर फेस येत आहे. नद्याचे पाणी खराब करणाऱ्यांवर कडक कारवाई होत नाही.
नदीच्या प्रदूषणावर एमपीसीबी बोर्डाकडे तक्रारी पाठवून कारवाई करण्यास सांगितले जाते. तसेच महापालिकेकडून देखील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
– संजय कुलकर्णी , मुख्य अभियंता, पया॔वरण विभाग, महापालिका





