खाद्यपदार्थांच्या व्यवसायातून मेहनतीने ऋतुजा देवरूखकर झाल्या आत्मनिर्भर

श्रीकांत कात्रे
घरकामाची जबाबदारी पूर्ण करून इतर काही व्यवसायाद्वारे कुटुंबाच्या प्रगतीला हातभार लावण्याची इच्छा अनेक महिलांची असते. त्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केला जातो. ऋतुजा देवरूखकर यांनीही याच विचारातून घरगुती स्वरूपात खाद्यपदार्थांचे उत्पादन घेत आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यांच्या चविष्ट पदार्थांमुळे अल्पावधीतच व्यवसायात जम बसला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक प्रगती होत गेली. त्यानंतर त्यांनी स्वतःचे दुकान थाटले. वेगवेळ्या मसाल्यांबरोबरच सणासुदीच्या काळात काही हंगामी पदार्थही त्या तयार करून लागल्या. व्यवसाय वाढल्यानंतर इतर काही महिलांना त्या रोजगारही उपलब्ध करून देऊ लागल्या…
घरगुती मसाले आणि घरगुती खाद्यपदार्थ तयार केल्यावर ओळखीच्या लोकांनी आणि नातेवाइकांनी त्याला दाद दिली. त्यामुळे या प्रकारचा व्यवसाय आपण करून शकतो, असा विश्वास ऋतुजा पर्शराम देवरूखकर यांच्या मनात निर्माण झाला. मग काही किराणा दुकानांतून आणि नातेवाइकांकडून या मसाल्यांना मागणी येऊ लागली. नंतर मसाल्यांबरोबरच वेगवेगळ्या प्रकारची पीठं, चटण्या, पापड असे इतर पदार्थही त्या तयार करू लागल्या. त्यांच्या हाताला चव होती.
घरगुती स्वरुपात तयार केलेल्या पदार्थांची मागणी त्यामुळे वाढत होती. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढविण्याची संधी होती. त्याच काळात माणदेशी फाउंडेशनशी त्यांचा संपर्क आला. मग माणदेशीतून मसाले तयार करण्याचे रितसर प्रशिक्षण त्यांनी घेतले. खुमासदार चवीला प्रशिक्षणाची जोड मिळाल्यावर मसाल्यांची मागणी वाढू लागली. चिपळूण तालुक्यातील सावर्डे हे त्यांचे गाव. तालुक्यात तसेच पुणे, मुंबईसारख्या शहरात त्यांचे मसाले व इतर पदार्थ पोहचू लागले.
समृद्धी मसाले या नावाची फर्म त्यांनी 2019 मध्ये सुरू केली. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. पण हे सारे यश सहजासहजी मिळालेले नाही. त्यामागे ऋतुजा यांचे कष्ट आहेत. काही तरी करून दाखविण्याची जिद्द त्यांच्या मनात होती. ग्रामीण भागात मोठ्या हिकमतीने त्यांनी ही व्यवसाय वाढवला. घरगुती स्वरुपात तयार होणाऱ्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवण्याचे कौशल्य त्यांनी सिद्ध केले. खरं तरं पूर्वी त्या घरामध्येच अगरबत्ती तयार करायच्या. मुले लहान असल्यामुळे छोट्या प्रमाणात हे काम चालायचे.
त्याचवेळी कुटुंबासाठी काही तरी करायचे या विचाराने त्या अस्वस्थ असायच्या. त्यातूनच पुढे हा व्यवसाय उभा राहिला. अगरबती किंवा तसाच एखादा उद्योग सुरू करण्याऐवजी खाद्यपदार्थ तयार करण्याचा व्यवसाय सुरु करण्याचे त्यांनी निश्चित केले. कारण रोजच्या आहारातील या पदार्थांची समाजाला गरज असते. रोजच्या जगण्यासाठी दैनंदिन जीवनातील या गरजेच्या वस्तू असतात, हे ओळखून त्यांनी हा व्यवसाय करण्याला प्राधान्य दिले. त्यात माणदेशी फाउडंशेनने केलेल्या मार्गदर्शनामुळे उभारी मिळाली.
मसाले प्रशिक्षणाबरोबरच व्यवसायासाठी लागणारे वेगवेगळे दाखले त्यांना मिळवून दिले. त्याशिवाय ऑनलाइन मार्केटिंग, अकाउंटस् अशा गोष्टी शिकता आल्या. घरगुती मसाले तयार करताना काही मर्यादा होत्या. आता मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा म्हणल्यावर विविध प्रकारचे मसाले त्या तयार करू लागल्या. त्यात प्रामुख्याने कोकणी, मालवणी, कोल्हापुरी, बिर्याणी मसाला, चाट किंवा गरम मसाला, मटण स्पेशल मसाला, मिसळ मसाला, पुलाव मसाला, चिकन स्पेशल मसाला अशा 15- 16 प्रकारच्या विविध मसाल्यांचे उत्पादन सुरु झाले. त्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे पापड, पीठं, अस्सल कोकणी मेवा, सर्व प्रकारची लोणची, सांडगे असे पदार्थही त्या तयार करून लागल्या.
दिवाळीचे व इतर हंगामी पदार्थ मागणीनुसार तयार होऊ लागले. आंब्यांच्या दिवसात आंबा पोळी, आमरस असे आंब्यांचे पदार्थ, फणसापासून पोळी व गऱ्याचे पदार्थ, आवळ्यापासून पेठा, सुपारी असे पदार्थ, खारे काजू, मसाला काजू यासारखे पदार्थ. दिवाळी पदार्थांपैकी चकली व मेथीचे लाडू ही तर त्यांची खासियत. चिवड्यालाही मोठी मागणी असते. त्याशिवाय दुकानात एजन्सी घेऊन घाण्यावर उत्पादित केलेले विविध प्रकारचे खाद्यतेलही ग्राहकांसाठी त्यांनी उपलब्ध केले. दुकान झाल्यापासून त्यांना पदार्थ तयार करण्यासाठी कमी वेळ मिळू लागला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या बचत गटातील इतर महिलांची मदत घ्यायला सुरवात केली.
त्यातही ऑर्डर्स वाढल्या तर इतर बचत गटातील महिलांकडून त्या पदार्थ तयार करून घेऊ लागल्या. या सर्व महिलांना रोजगारही उपलब्ध होऊ लागला. एवढी मोठी उलाढाल वाढल्यामुळे त्यांचा रोजचा दिवस कसा संपतो, हेच लक्षात येत नाही. सकाळी लवकर उठून घरकाम आवरून दुकानात यायचे ते रात्री घरी जायचे. यावेळेत दुकान सांभाळण्याबरोबरच इतर ऑर्डर्स घेणे, त्यांच्या पूर्ततेचे नियोजन करणे अशी कामे करायची.
मोठी ऑर्डर असेल तर रात्री घरी आल्यावर इतर महिलांची मदत घेऊन ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्यांना रात्र जागवावी लागते. असे कष्ट करीत असल्यामुळेच त्यांनी या व्यवसायाद्वारे आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता त्यांची मुलगी पुण्यात सी. ए. करत आहे. मुलगा बारावीत शिकत आहे. या दोघांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना आपल्या व्यवसायात वाढ करायची आहे. त्यांची ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्या मेहनत घेत आहेत. लोकांच्या गरजा ओळखून आपले कसब सिद्ध करत एखादा व्यवसाय यशस्वी करणे सोपे नाही. परंतु, ऋतुजा यांनी ते सिद्ध करून दाखविले आहे. कष्ट आणि जिद्दीने ऋतुजा यांनी केलेलाप्रवास इतरांसाठी अनुकरणीय असाच आहे.





