Riteish Deshmukh : मराठा आरक्षण आंदोलनावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया; म्हणाला, “सणासुदीच्या काळात सर्व आंदोलक सुखरूप घरी परतावेत”

Riteish Deshmukh On Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. यामध्ये राज्यभरातून हजारो मराठा बांधव सहभागी झाले असून, कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार जरांगेंनी व्यक्त केला आहे.
राजकीय क्षेत्रासोबतच आता मनोरंजन विश्वातूनही या आंदोलनावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला आहे.
रितेश देशमुखची पोस्ट
रितेश म्हणाला, “सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. मनोज जरांगेजी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र.”
सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो… pic.twitter.com/1lIELovdJC
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 29, 2025
आंदोलनामुळे वाहतूककोंडी
मनोज जरांगेंना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रभरातून हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असल्याने शहरातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडीही निर्माण झाली आहे. त्यामुळेच आंदोलक सुखरूप आपल्या गावी परतावेत, अशी अपेक्षा रितेशने आपल्या पोस्टमधून व्यक्त केली.
रितेश देशमुख नेहमीच सामाजिक व राजकीय घडामोडींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करताना दिसतो. त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर त्याने दिग्दर्शित केलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.




